दरवाजे दुरुस्तीचे काम सुरू : गरज भासल्यास साळ नदीतून पाणी उपशाचा पर्याय
प्रतिनिधी | गोवन वार्ता
पणजी : आमठाणे धरणात १ जुलै अखेरीस ४.७ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. सध्या येथे जुने दरवाजे दुरुस्ती करण्याचे, तसेच नवीन स्वयंचलित दरवाजा बसवण्याचे काम सुरू आहे. यामुळे धरणात येणारे पावसाचे पाणी तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आले आहे. काम पूर्ण होण्यासाठी २० ते २५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. असे असले तरी यादरम्यान बार्देश, पेडणे तालुक्यांत पाणी टंचाई भासणार नाही. गरज पडल्यास साळ नदीतून पाणी उपसा केला जाणार आहे, अशी माहिती जलस्रोत अधिकाऱ्यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात महाराष्ट्राच्या हद्दीतील तिळारी कालव्याच्या दुरुस्ती कामांमुळे येथून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यावेळी आमठाणे धरणातून पर्यायी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र धरणाचे ५० वर्षांपूर्वीचे एक गेट उघडता आले नाही. यामुळे बार्देश तालुक्यात पाणी टंचाई झाली होती. यानंतर खात्याने नौदलाच्या मदतीने हे गेट उघडले. अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी येथे नवीन गेट घालण्याचा आणि अन्य दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला होता.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा १ जुलै अखेरीस राज्यातील सहापैकी पाच धरणांत अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. १ जुलै २०२४ रोजी साळावली धरणात ६०.६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यंदा या धरणात १०३.९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. अंजुणे धरणात मागील वर्षी २६.८ टक्के, तर यावर्षी २९.७ टक्के पाणीसाठा आहे. पंचवाडीत मागील वर्षी ४३.३ टक्के, तर यंदा ९२.७ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी १ जुलै रोजी आमठाणेत ५२.८ टक्के पाणीसाठा होता. तिळारी धरणात १ जुलै २०२५ अखेरीस ७३.६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
जुलैमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस
हवामान खात्याच्या मासिक मासिक अंदाजानुसार, जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमानही सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. राज्यात १ जून ते १ जुलै दरम्यान सरासरी ३१.९२ इंच पावसाची नोंद झाली. पुढील सहा दिवस राज्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.