आंदोलनानंतर पहिली मागणी पूर्ण : डॉक्टर दिनीच नियुक्ती
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राजकारणाचा फटका बसलेले आणि तीन वर्षांपूर्वी नियुक्ती होऊनही खुर्चीवर बसू न शकलेले डॉ. जयप्रकाश तिवारी यांची गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या नियमित डीनपदावर सरकारने नियुक्ती केली. २०२२ मध्ये काढलेला परंतु नंतर स्थगित ठेवलेला आदेश सरकारने आता मागे घेतला आहे. विशेष म्हणजे डॉक्टर दिनाच्या दिवशीच ही नियुक्ती झाल्यामुळे गोमेकॉसह राज्यातील डॉक्टरांनीही आनंद व्यक्त केला.
गोमेकॉच्या डीनपदावरील डॉ. शिवानंद बांदेकर ३० जून रोजी सायंकाळी सेवानिवृत्त झाले. त्यांना मुदतवाढ मिळेल अशी चर्चा होती; पण दै. ‘गोवन वार्ता’ने ११ जून रोजीच ‘डॉ. जयप्रकाश तिवारी होणार गोमेकॉचे नवे डीन’ असे वृत्त प्रसिद्ध केले होते. मंगळवारीही दै. ‘गोवन वार्ता’ने डॉ. बांदेकर यांच्या निवृत्तीचे आणि डॉ. तिवारी यांची डीनपदी नियुक्ती होईल, असे वृत्त छापले होते. मंगळवारी सायंकाळी सरकारने २०२२ मध्ये जारी करून स्थगित ठेवलेला आदेश रद्द केल्याचे, तसेच डॉ. तिवारी यांची डीनपदी नियुक्ती केल्याचा लेखी आदेश पर्सोनेल खात्याच्या अवर सचिव दुर्गा किनळेकर यांनी जारी केला.
दरम्यान डॉ. तिवारी यांची गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनपदी नियुक्ती झाल्यामुळे गोमेकॉतील डॉक्टरांसह खासगी डॉक्टरांनीही त्यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे. सरकारने एका चांगल्या डॉक्टरलाच नव्हे तर चांगल्या माणसाला डीनपदावर नियुक्त केले आहे. डॉ. तिवारी यांच्या नियुक्तीचा फायदा फक्त गोमेकॉला नव्हे, तर राज्यातील लोकांनाही होणार आहे, असे डॉ. ऑस्कर रिबेलो म्हणाले.
काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्र्यांनी गोमेकॉचे डॉ. दुर्गेश कुट्टीकर यांना अपमानास्पद वागणूक दिल्यानंतर डॉक्टरांनी आंदोलन केले होते. त्या आंदोलनावेळी डीनपदाची प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सरकारला सांगितले होते. मुख्यमंत्र्यांनी ती मागणी पूर्ण केली. त्यासाठी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांचे धन्यवाद, असे डॉ. मधू घोडकिरेकर यांनी म्हटले आहे.
सरकारने एका चांगल्या डॉक्टरला आणि चांगल्या माणसाला गोमेकॉच्या डीनपदावर नियुक्त केले आहे. लोकांना त्यांचा फायदा होईल. त्यांच्या नेतृत्वाखाली गोमेकॉत रुग्णांना चांगली सेवा मिळेल यात शंका नाही.
- डॉ ऑस्कर रिबेलो
गोमेकॉतील व्हीआयपी संस्कृती बंद व्हावी आणि डीनपदाची पत, त्या पदाचा दर्जा जपला जावा, अशी आमची मागणी होती. डॉ. तिवारी यांच्या नियुक्तीमुळे ही मागणी पूर्ण झाली आहे. यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे आभार.
- डॉ. मधू घोडकिरेकर.
राजकीय हस्तक्षेपामुळे २०२२ मध्ये हुकले डीनपद
मूत्रपिंड (नेफ्रोलॉजी) विभागाचे प्रोफेसर असलेले डॉ. जयप्रकाश तिवारी यांची डीनपदावर नियुक्ती करण्याची शिफारस गोवा लोकसेवा आयोगाने २०२२ मध्ये केली होती. सरकारने त्यावर प्रक्रिया करून त्यांच्या नियुक्तीचा आदेशही जारी केला होता; पण राजकीय हस्तक्षेपामुळे सरकारला तो आदेश स्थगित ठेवावा लागला. त्यानंतर डॉ. शिवानंद बांदेकर यांची त्या पदावर नियुक्ती झाली. डॉ. बांदेकर ३० जूनला निवृत्त झाल्यानंतर ज्येष्ठतेप्रमाणे डॉ. तिवारी यांना २०२२ मध्ये डीनपदी दिलेली बढती सरकारने सोमवारी कायम केली. दरम्यान डॉ. तिवारी हे निवृत्तीच्या जवळ आहेत. डीनपदावर त्यांना फक्त एक वर्ष काम करता येईल. त्यानंतर त्यांचे काम पाहून सरकार मुदतवाढीचा विचार करू शकते किंवा नवा डीन नियुक्त होऊ शकतो.