टॅक्सी विषयावरून 'एक्स'वर राज्याची प्रतिमा डागाळण्याचे प्रयत्न
पणजी: गोवा सरकार आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Dr. Pramod Sawant) यांची बदनामी करणारे 'टूलकिट' सोशल मीडियावर सक्रिय झाले आहे. गोव्यात टॅक्सी विषयावरून मुख्यमंत्र्याना लक्ष्य करून गोव्याची बदनामी करणाऱ्या पोस्टचा 'एक्स'वर सपाटा सुरू करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि कळंगुटचे (Calangute) आमदार मायकल लोबो यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर दुस्त्या दिवशी टॅक्सी विषयावरून मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यावर 'एक्स'वर काही युजर जोरदार टीका करताना दिसले. 'टॅक्सी माफिया' या शब्दाने युजरनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.
मुख्यमंत्री गोव्याची प्रतिमा आणि अर्थव्यवस्था सांभाळण्याऐवजी टॅक्सी (Taxi) माफियांना संरक्षण देत आहेत. पर्यटकांना (Tourist) खंडणी नको, तर समान वागणूक आणि आदर हवा आहे. राज्याची प्रतिमा जपणाऱ्या नेत्याची गोव्याला गरज आहे, अशी एक पोस्ट दुस्त्या वापरकर्त्याने केली होती.
गोव्यातील ॲग्रिगेटरच्या टॅक्सींना माध्यमातून समान भाडेतत्त्वाची अंमलबजावणी करण्याबाबत राज्य सरकार आग्रही होते. मात्र टॅक्सीवाल्यांनी प्रखर विरोध केल्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला. यावरून 'टूलकिट'च्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर शरसंधान केले जात आहे.
यापूर्वीही 'टूलकिट' होते सक्रिय...
याआधी' एक्स' वर गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू होते. गोव्यात (Goa) पर्यटक येत नाहीत आणि गोवा सोडून जात आहेत, अशा पोस्ट सुमारे महिनाभर फिरत होत्या. हे गोव्याविरुद्ध बदनामीचे 'टूलकिट' असून, गोव्याच्याच सरकारमधील मंत्री हे 'टूलकिट' चालवत आहेत, असा आरोप दुसऱ्या एका मंत्र्याने केला होता