बार्देश : पिर्णातील रस्ता रुंदीकरणाच्या प्रश्नावर मंत्र्यांचा कानाडोळा : मनोज परब

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
02nd July, 02:30 pm
बार्देश : पिर्णातील रस्ता रुंदीकरणाच्या प्रश्नावर मंत्र्यांचा कानाडोळा : मनोज परब

पणजी : पिर्ण गावातील प्रस्तावित रस्ता रुंदीकरणामुळे येथील स्थानिक धास्तावले आहेत. येथील सुमारे ७० टक्के लोकांची घरे, दुकाने, शेती, मंदिरे या रस्त्याच्या बाजूलाच आहेत. आता रुंदीकरणासाठी नोटीस येत असल्याने स्थानिक धास्तावले आहेत. मात्र थिवीचे आमदार आणि मंत्री नीळकंठ हळर्णकर, सरपंच संदीप तानावडे याबाबत गंभीर नाहीत. त्यांना लोकांच्या समस्यांशी देणेघेणे नाही. यामुळेच ते स्थानिकांना तोंड दाखवत नाहीत असा आरोप आरजीपी अध्यक्ष मनोज परब यांनी केला.

बुधवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत परब म्हणाले की, प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. यामुळे लोकांची घरे, शेती, दुकाने जाणार आहेत. याआधी ग्रामसभेत मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी उपस्थित राहून लोकांना स्पष्टीकरण देण्याबाबत ठराव घेण्यात आला होता. मात्र हळर्णकर यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी एक प्रकारे लोकांचा अपमान केला आहे. सरपंच संदीप तानावडे हे पूर्वी लोकांसोबत सोबत असण्याचे नाटक करत होते. मात्र आता ते उघडे पडले आहेत. काही दिवसांपूर्वी हळर्णकर लपून छपून गावात आले आणि रोपटी वाटून निघून गेले. कदाचित लोकांना तोंड दाखवण्याची त्यांची हिंमत झाली नसावी. 

सध्या आमदार विजय सरदेसाई आणि खासदार विरीयातो फर्नांडिस हे पिर्ण गावात येऊन राजकारण करत आहेत. त्यांनी आधी आपल्या मतदासंघांतील प्रश्न सोडवावेत. मुळात १०,१५ आणि २५ मीटर लांबीचे रस्ते हे प्रादेशिक आराखडा २०२१ मधून आले आहेत. तत्कालीन काँग्रेस सरकारने गोव्यातील जमिनी दिल्लीकरांच्या घशात घालण्यासाठी हा आराखडा आणला होता. पर्रीकरांचे सरकार आल्यावर तो स्थगित ठेवण्यात आला होता. विजय सरदेसाई नगर नियोजन मंत्री झाल्यावर तो पुन्हा खुला करण्यात आला. सध्याची भाजप सरकार तोच पुढे रेटत असल्याचे परब यांनी सांगितले.



हेही वाचा