पणजी : नेसाय-कुडतरी येथे राहणाऱ्या फातिमा कुलासो (वय ४६) या महिलेला काल मंगळवारी सकाळी अंगणात ब्रश करत असताना सर्पदंश झाला होता. फातिमा यांना तत्काळ दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथून पुढे अधिक उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शवविच्छेदन अहवालानुसार, तिचा मृत्यू हेमॉटॉक्सिक सर्पदंशामुळे झालेला मेंदूतील रक्तस्राव व जमिनीवर पडल्याने डोक्याला बसलेला जबर मार यामुळे झाला आहे.
या प्रकरणात कोणतीही संशयास्पद बाब आढळून आलेली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मायना-कुडतरी पोलीस स्थानकाच्या महिला पोलीस उपनिरीक्षक सोनल गावकर पुढील तपास करत आहेत.