जीटीडीसीच्या कनिष्ठ अभियंत्याविरोधात लाचप्रकरणी एसीबीकडून आरोपपत्र दाखल

कंत्राटदाराकडून लाच घेताना २०१९ मध्ये पकडले होते रंगेहात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
9 hours ago
जीटीडीसीच्या कनिष्ठ अभियंत्याविरोधात लाचप्रकरणी एसीबीकडून आरोपपत्र दाखल

पणजी : पर्यटन विकास महामंडळाचा (जीटीडीसी) कनिष्ठ अभियंता विभेश प्रभुदेसाई याला कंत्राटदाराकडून पाच हजारांची लाच घेताना दक्षता खात्याच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने (एसीबी) २०१९ मध्ये रंगेहात पकडून कारवाई केली होती. या संदर्भात तपास पूर्ण करून एसीबीने प्रभुदेसाई विरोधात मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात ३५० पानी आरोपपत्र दाखल केले आहे.

एसीबीने या प्रकरणी २२ जानेवारी २०१९ रोजी गुन्हा दाखल केला होता. टॅक्सी कंत्राटदार काशीराम माटकर यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. तक्रारदार पर्यटन विकास महामंडळाला टॅक्सी भाड्याने देत होते. त्यानुसार त्याच्या बिलाची रक्कम देण्यासाठी कनिष्ठ अभियंता विभेश प्रभुदेसाई यांनी त्याच्याकडे ४० हजार रुपयांची लाच मागितली होती. याची दखल घेऊन एसीबीचे तत्कालीन निरीक्षक फ्रान्सिस कोर्त यांनी प्रभुदेसाई याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर तक्रारदाराने प्रभुदेसाई यांना संबंधित रक्कम जास्त असल्यामुळे कमी करण्याची विनंती केली. यावेळी त्यांनी ५ हजार रुपयांची लाच मागितली. तसेच प्रभुदेसाई याने संबंधित लाचेची रक्कम सायंकाळी कार्यालयात घेऊन येण्यास सांगितले होते. त्यानुसार, तत्कालीन निरीक्षक फ्रान्सिस कोर्त, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक फटी मोरजकर, हवालदार सुनील फालकर, के. जी. मनोज, पोलीस काॅन्स्टेबल सुनीता कारापूरकर, पोलीस काॅन्स्टेबल आनंद कोळंबकर, स्वप्निल साळगावकर या पथकाने २२ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी ५.३० वाजता पाटो येथील पर्यटन विकास महामंडळाच्या कार्यालयाबाहेर सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने इशारा केल्यानंतर एसीबीच्या पथकाने पाच हजारांची लाच घेताना संशयित प्रभुदेसाई याला रंगेहाथ पकडले आणि नंतर अटक केली होती. न्यायालयात हजर केल्यावर त्याची सशर्त जामिनावर सुटका केली होती.

३५० पानी आरोपपत्र दाखल

दक्षता खात्याच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने तपास पूर्ण करून मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात विभेश प्रभुदेसाई याच्याविरोधात ३५० पानी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात ३४ साक्षीदारांची साक्ष नोंद करण्यात आली आहे. 

हेही वाचा