नागरी पुरवठा, ग्राहक व्यवहार विभागाची कारवाई : सात वाहने, एक हजार घरगुती, व्यावसायिक सिलिंडर ताब्यात
वास्को : सांकवाळ येथील पिकॉक व्हॅलीच्या मोकळ्या जागेत मुरगाव तालुका नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार विभागाचे सहाय्यक संचालक तुळशीदास दाबोळकर व भरारी पथकाने मंगळवारी छापा घालून सात वाहने, एक हजार घरगुती व व्यावसायिक सिलिंडर ताब्यात घेतले. याप्रकरणी दाबोळकर यांनी तक्रार केल्यावर वेर्णा पोलिसांनी सदर सात वाहने व एक हजार सिलिंडर जप्त केले.
सांकवाळ येथील पिकॉक व्हॅलीच्या मोकळ्या जागेत काही वाहने उभी असून, त्यातील सिलिंडरांची चढउतार करण्यात येत असल्याची माहिती कोणीतरी मोबाईलवरून नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार खात्याच्या पणजीतील मुख्य कार्यालयाला कळविली. याची माहिती खात्याच्या वास्को विभागाला देण्यात आली. त्यामुळे सहाय्यक संचालक दाबोळकर, इतर अधिकारी तसेच पणजी कार्यालयातून आलेले भरारी पथक तेथे पोहचले. तेथे सात वाहने उभी असलेली दिसली. त्यामध्ये सिलिंडरवाहक दोन मोठे ट्रक, चार पिकअप होते. ही सहा वाहने पिलार येथील एका गॅस एजन्सीची होती. तेथे अज्ञात व्यक्तीचे एक वाहन उभे होते. भरारी पथक तेथे पोहचल्यावर त्यांनी चौकशी करण्यास आरंभ करण्यापूर्वी तेथे काम करणाऱ्या कामगार व काही चालकांनी पळ काढला. तेथे दोन चालक हाती लागले.
भरारी पथकाला तेथे बीपीएसीएल व एचपीसीएलचे सिलिंडर आढळले. त्यापैकी काही सिलिंडरचे वजन करण्यात आले, तेव्हा बीपीसीएलचे घरगुती सिलिंडरांचे वजन कमी आढळले. सदर वजन १४.२ किलोग्रॅम असले पाहिजे होते, ते बारा, तेरा किलोग्रॅम आढळून आले. सीलबंद नसलेले व्यावसायिक सिलिंडरांचे वजन अधिक असल्याचे आढळले. याप्रकरणी चौकशी केली असता, संबंधितांनी सक्षम अधिकाऱ्यांकडून कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नव्हती. परवानगी न घेता, योग्य सुरक्षा उपाययोजना न करता, योग्य खबरदारी न घेता, मानवी जीवनाला धोका निर्माण करणे वगैरे बेकायदेशीर प्रक्रियेत गुंतल्याचे उघड झाले. तसेच अधिकृत परवानगी न घेता, कोणतीही कागदपत्रे नसताना बेकायदेशीरपणे एलपीजी सिलिंडरांची हाताळणी तेथे करण्यात येत असल्याचे तसेच सिलिंडरांची साठवण करून ठेवल्याचे आढळून आले. जनतेला एलपीजी सिलिंडरचा नियमित पुरवठा करण्याच्या प्रक्रियेत बाधा आल्याचे दिसून आले. याप्रकरणी योग्य ते सोपस्कार करण्यात आल्यावर वेर्णा पोलिसांना माहिती देण्यात आली. वेर्णा पोलिसांनी पंचनामा करून सदर वाहने व सिलिंडर जप्त केले. वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक आनंद शिरोडकर पुढील तपास करीत आहेत.
अद्याप कोणाला अटक नाही!
भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २८८, १२५ आर/डब्ल्यू ३(५) पेट्रोलियम कायदाच्या कलम २३ व जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५च्या कलम सात (ii) तसेच कायदा १८८४च्या कलम ९B(b) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तथापी अद्याप कोणासही अटक करण्यात आली नाही. याप्रकरणी वेर्णा पोलीस चौकशी करीत आहेत.