चालकाला अटक : ३२ लाखांची मालमत्ता जप्त
वाळपई : गोव्यातून बेळगावच्या दिशेने चोर्लामार्गे जाणाऱ्या टेम्पोवर केरी येथे कारवाई करून सत्तरी अबकारी खात्याच्या कर्मचाऱ्यांनी १२ लाखांचा बेकायदेशीर दारूसाठा जप्त केला आहे. यासाठी वापरण्यात आलेली पिकअप ताब्यात घेण्यात आली आहे. एकूण ३२ लाखांची मालमत्ता अबकारी खात्याच्या कर्मचाऱ्यांनी जप्त केली आहे.
कारवाई मंगळवारी दुपारी केरी येथील अबकारी खात्याच्या चेकनाक्यावर करण्यात आली. पकडण्यात आलेली पिकअप ही कर्नाटकातील असून तिला गोवा नंबरची बनावट नंबर प्लेट लावण्यात आली होती.
संशयास्पद पिकअप केरी चेकपोस्टवर अडविली
जी. ए. ०७ एन २६२९ क्रमांकाची पिकअप चोर्लामार्गे बेळगाव या ठिकाणी जात होती. बसच्या मागे ही पिकअप चालत होती. सदर पिकअप तपासणीसाठी अडविण्यात आली. पिकपमध्ये लाकडाचा भुसा भरण्यात आलेला आहे अशी माहिती चालकाकडून कर्मचाऱ्यांना देण्यात आली. तपासणी केली असता पिकपच्या मागच्या बाजूला भुसा व पुढच्या बाजूला भुसा व मध्ये दारूसाठा लपवून ठेवला होता.
गोवा बनावटीचा १२ लाखांचा माल जप्त
हरमलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा बनावटीचा सुमारे १२ लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये सुमारे सातशे बाटल्या आढळून आल्या. पिकअपही ताब्यात घेण्यात आली आहे. पिकपची किंमत २० लाख असून एकूण ३२ लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेला माल किरणपाणी तर पिकअप दोडामार्ग येथे ठेवण्यात आली आहे.
पिसुर्ले या ठिकाणी सदर माल पॅक करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
अबकारी पथकाची तत्पर कारवाई
कारवाई वाळपई अबकारी खात्याचे निरीक्षक भोला हरमलकर, सहाय्यक उपनिरीक्षक सुशांत फडते, जितेंद्र गावस, सखाराम पर्येकर, राजेंद्र नाईक, पांडुरंग पर्येकर, कृष्णा गावस यांच्या पथकाने केली. वाहन ताब्यात घेऊन चालकाला अटक करण्यात आली आहे. तपास वाळपई अबकारी विभाग करत आहे.
पिकअपच्या चालकाला अटक
खात्याने पिकअपचा चालक मंजुनाथ बुद्धीहाल (हनुमंत गल्ली बेळगाव) याला अटक केली आहे. त्याच्याकडून या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, सदर माल सत्तरीतील एका फॅक्टरीमधून तर काही माल कोलवाल येथून भरण्यात आल्यची माहिती त्याने दिल्याचे समजते.