साखळी प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला प्रकार
पणजी : ड्युटीला उशिराने हजर झालेल्या कर्मचाऱ्याला कारण विचारल्याने वॉर्ड इन्चार्जला शिवीगाळ करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना साखळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली. रुग्णसेवेसारख्या संवेदनशील क्षेत्रात शिस्तीचा भंग करणारी ही घटना कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे. या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी अतुल पै बीर यांनी तक्रार दाखल केल्यानंतर संशयित संतोष वरक (वय ३८, रा. श्रीराम कॉलनी, सालेली, सत्तरी) याला पोलिसांनी अटक केली आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार संतोष वरक हा साखळीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मल्टीटास्किंग स्टाफ म्हणून कार्यरत आहे. त्याची ड्युटी २ जुलै रोजी सकाळी ८ वाजता होती. मात्र तो तब्बल दीड तास उशिरा, म्हणजे ९.४० वाजता केंद्रात हजर झाला. यावेळी वॉर्ड इन्चार्ज सुरेश सिनारी (वय ५३) यांनी त्याला उशिरा येण्याबाबत विचारणा केली.
या गोष्टीचा संतोष वरकला राग आला आणि त्याने सुरेश सिनारी यांच्याशी हुज्जत घालत सिनारी यांना थप्पड लगावली. या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी अतुल पै यांनी तक्रार दिली असून, सुरेश सिनारी आपले कर्तव्य पार पाडत असताना त्यांना रोखण्यासाठी बळाचा वापर केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
संशयित संतोष वरक याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३५२ (हल्ला) , १३२ (सरकारी कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा आणणे) आणि २२१ (कर्तव्य बजावताना केलेला विरोध) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संतोषला त्याच दिवशी म्हणजे २ जुलै रोजी सायंकाळी ४.४२ वाजता अटक केल्याची माहिती मिळाली आहे.