मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेत भंडारी समाजाची उडी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
02nd July, 04:02 pm
मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेत भंडारी समाजाची उडी

पणजीः गोव्यात अपेक्षित मंत्रिमंडळ फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर गोमंतक भंडारी समाजाच्या संयुक्त गटाने भाजपकडे तसेच मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्याकडे मंत्रिमंडळात भंडारी समाजातील आणखी एका आमदाराचा समावेश करावा अशी मागणी केली आहे.  एका खुल्या पत्राद्वारे भंडारी समाजाचे प्रतिनिधित्व मंत्रिमंडळात अपुरे आहे त्यामुळे किमान एक अतिरिक्त मंत्रिपद देण्याची आमची मागणी आहे असे भंडारी समाजाचे संजीव नाईक यांनी म्हटले आहे.  

भंडारी समाज गोव्याच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे ३०% आणि हिंदू लोकसंख्येच्या सुमारे ५०% इतका वाटा आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येचा समुदाय असूनही सध्या मंत्रिमंडळात आमचे केवळ दोन मंत्री आहेत. हे आमच्या लोकसंख्याशास्त्रीय ताकदीच्या आणि सामाजिक-राजकीय योगदानाच्या तुलनेत कमी आहे असे समाजाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

भंडारी समाजाने नेहमी सत्ताधारी पक्षाला निष्ठेने पाठिंबा दिला आहे आणि राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी मोलाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे फेरबदलाच्या वेळी प्रतिनिधित्वात वाढ करून ओबीसी संबंधित खात्याची जबाबदारी भंडारी समाजातील प्रतिनिधीकडे देण्याची अपेक्षा पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.

गोमंतक भंडारी समाजाच्या संयुक्त गटाने इशारा दिला आहे की, फेरबदलाच्या प्रक्रियेत सध्याच्या भंडारी समाजाच्या मंत्र्यांना वगळल्यास किंवा तो समाजावर अन्याय ठरेल आणि भाजपला दीर्घकाळ दिलेल्या पाठिंब्याला धक्का बसेल असेही पत्रात म्हटले आहे. आम्ही आमच्या नेत्यांच्या पाठीशी आहोत. त्यांचा मंत्रिमंडळातील समावेश हा आमच्यासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायक आहे. सत्ताधारी पक्षाने भंडारी समाजाचे योगदान लक्षात घेऊन निर्णय घ्यावेत असे भंडारी समाजाने म्हटले आहे. हा पत्राद्वारे भंडारी समाजाने सामाजिक दबावाचे तंत्र अवलंबले असून भाजपसमोर या गोष्टीमुळे पेच निर्माण होऊ शकतो


हेही वाचा