शिष्यवृत्तीचे अर्ज करण्यासाठी खास पोर्टल सुरू, ५० हजार विद्यार्थ्यांना होणार लाभ
पणजी : प्राथमिक स्तर ते उच्च शिक्षणापर्यंत विद्यार्थ्यांसाठी राज्य व केंद्र सरकारच्या अनेक शिष्यवृत्ती (Scholarship) योजना आहेत. या योजनांसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करणे शक्य व्हावे, म्हणून सरकारने खास पोर्टल सुरू केले आहे. चीफ मिनीस्टर्स प्रीमॅट्रीक अॅन्ड पोस्टमॅट्रीक स्कॉलरशिप पोर्टलचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंंत (CM Dr. Pramod Sawant) यांच्या हस्ते शुभारंभ झाला.
मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमाला समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई उपस्थित होते. https://cmscholarship.goa.gov.in/flogin.aspx असे या पोर्टलचे नाव असून राज्यभरातील विद्यार्थी या पोर्टलवर अर्जासह प्रमाणपत्रे सादर करू शकतात. या पोर्टलचा राज्यातील ५० हजार विद्यार्थ्यांना (Student) लाभ होणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. बरेच विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र असतात, मात्र ते अर्ज करत नाहीत.
पोर्टलवर अर्ज सादर केल्यानंतर १५ दिवसांत त्याना शिष्यवृत्तीचे पैसे मिळणार आहेत. पैसे मिळण्यासाठी जास्तीत जास्त एक महिन्याचा अवधी लागू शकतो. एससी, एसटी, ओबीसी तसेच आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, समाज कल्याण खात्याच्या योजना (Social Welfare) आहेत. या सर्व योजनांच्या शिष्यवृत्तीसाठी या पोर्टलवर अर्ज करता येणार आहे.
नर्सिंग तसेच इतर शिक्षणासाठी बरेच विद्यार्थी परराज्यात जातात. त्यांना ४० हजार रुपयांपर्यंत शुल्कासाठी शिष्यवृत्ती मिळण्याची तरतूद आहे. शुल्क भरल्यानंतर त्याच्या पावत्या व इतर प्रमाणपत्रे सादर करावी लागतील. विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनाही या पोर्टलची माहिती दिली जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे.