पणजी : केटीसी बसस्थानकावर एफडीएने राबवली विशेष मोहीम

२६ दुकाने व गाळ्यांचे निरीक्षण

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
02nd July, 12:39 pm
पणजी : केटीसी बसस्थानकावर एफडीएने राबवली विशेष मोहीम

पणजी : गोव्यातील अन्न सुरक्षेच्या निकषांना बळकट करण्याच्या उद्देशाने अन्न व औषध प्रशासन संचालनालयाकडून आज पणजी येथील केटीसी बसस्थानक परिसरात विशेष तपासणी मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेत खाद्यपदार्थाची विक्री करणाऱ्या एकूण २६ दुकाने आणि गाळ्यांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेदरम्यान काही विक्रेत्यांनी मागील तपासणीनंतर स्वच्छतेबाबत लक्षणीय सुधारणा केली असल्याचे एफडीएच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

तथापि, आंतरराज्य बसस्थानकाच्या परिसरात उंदरांचा त्रास गंभीर स्वरूपात आढळून आल्याने, या परिसरातील ७ व्यवसायांना तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले. जोपर्यंत परिसरातील स्थिती सुधारली जात नाही, तोपर्यंत या खाद्यव्यवसायांना पुन्हा सुरूवात करण्यास मनाई करण्यात आली आहे.

फूड सेफ्टी अ‍ॅक्ट २००६ मधील कलम ६९ अंतर्गत कारवाई करत तीन विक्रेत्यांवर प्रत्येकी १० हजार रुपये  तर इतर दोन विक्रेत्यांवर अनुक्रमे ५ हजार आणि २ हजार असा दंड ठोठावण्यात आला. याशिवाय, केटीसी परिसरातील चार स्टॉल चालकांना स्वच्छतेच्या उल्लंघनासाठी प्रत्येकी ५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला. कलम ३२ अंतर्गत सुधारणा नोटीसाही बजावण्यात आल्या असून, पुढील आठवड्यात पुन्हा एकदा फेरतपासणी केली जाणार आहे.

ही कारवाई एफडीएच्या संचालक श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रिचर्ड नोरोन्हा यांच्या नेतृत्वाखाली श्रध्दा खुदकर, अंकिता पालयेकर, प्रितम परब, साफीया खान, लेनिन डीसा आणि अमित मांद्रेकर या अधिकाऱ्यांनी केली. यावेळी केटीसी डेपो व्यवस्थापकही उपस्थित होते.

हेही वाचा