पणजी : भाजपच्या आजी, माजी आमदारांनी एकमेकांवर ड्रग्ज विक्रीचे आरोप केले आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांनी कारवाई करणे आवश्यक आहे. असे न झाल्यास आम्ही पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचे खासदार विरीयातो फर्नांडिस यांनी सांगितले. गुरुवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अमरनाथ पणजीकर, ॲड. जितेंद्र गावकर, वीरेंद्र शिरोडकर, सावियो डिसिल्वा व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
फर्नांडिस म्हणाले की, गोव्यात ड्रग्जचा फैलाव वाढल्याचे काँग्रेसने वेळोवेळी उजेडात आणले आहे. काही दिवसांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री बाबु आजगावकर आणि पेडणेचे विद्यमान आमदार प्रवीण आर्लेकर एकमेकांवर ड्रग्ज विक्रीचे आरोप केले होते. यामुळे त्यांनी गोवा देशाची ड्रग्ज राजधानी असल्याचे सिद्ध केले आहे. तसेच भाजप नेते ड्रग्ज व्यवहारात आहेत हे देखील स्पष्ट झाले आहे. या दोघांसह या प्रकरणी अन्य कोणी गुंतले आहेत का याचीही पोलीस चौकशी झाली पाहिजे.
ते म्हणाले, पेडण्यातील लोक हे स्वाभिमानी पेडणेकर म्हणून ओळखले जातात. मात्र तेथील या दोन नेत्यांच्या वक्तव्याने पेडणेकरांच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचला आहे. बाबु आजगावकर यांनी पेडण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी सरकार, गृह खाते आणि मुख्यमंत्र्यांना उघडे पाडले आहे. या प्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी नेत्यांनी आपल्या वर्तनाने पक्षाची बदनामी होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले. त्यांना गोव्यातील ड्रग्जच्या प्रश्नापेक्षा पक्षाची प्रतिमा मोठी वाटत आहे.
अमरनाथ पणजीकर म्हणाले की, गेल्या काही वर्षात राज्यात ड्रग्जचा सुळसुळाट झाला आहे. मोठ्या शहरांसह आता छोट्या गावात देखील ड्रग्स सहज उपलब्ध होत आहेत. मागील चार वर्षात गोव्यात ६०० किलोहून अधील अमली पदार्थ जप्त झाले आहेत. या प्रकरणात अटक झालेल्या ६९१ जणांपैकी १९५ गोमंतकीय व्यक्ती होत्या. ही चिंतेची बाब असली तरी भाजपला केवळ पुढील निवडणुकांचीच काळजी आहे.
परब भाजपचे दलाल : खासदार विरियातो यांचा आरोप
काँग्रेस पक्षाचे नेते पिर्णामधील समस्या जाणून घेण्यासाठी गेले होते. आम्ही जेव्हा भाजपला उघडे पाडतो तेव्हा मनोज परब यांना मिरची लागते. ते प्रत्येक वेळी आपण भाजपचे दलाल असल्याचे सिद्ध करतात अशी टीका विरीयातो फर्नांडिस यांनी केली.