मुसळधार पावसामुळे कुशावती नदीला पूर; वाहतूक चांदरमार्गे वळवली
केपे: राज्यात बुधवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे कुशावती नदीला पूर आल्याने आज सकाळी पारोडा पूल व केपे ते मडगाव हा मुख्य रस्ता पाण्याखाली गेला. सध्या या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली असून सदर वाहतूक चांदरमार्गे वळविण्यात आली आहे.
दरवर्षी पावसाळ्यात कुशावती नदीवर (Kushawati River) असलेला पारोडा गावाला जोडणारा पूल व मडगावला जाणार रस्ता पाण्याखाली जातो. या गैरसोयीबाबत कित्येक वर्षांपासून येथील स्थानिकांनी पुलासाठी व रस्त्यासाठी सरकारकडे उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. मात्र सरकार या समस्येकडे लक्ष देत नसल्याने पारोडा गावातील या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय.
(पारोडा पुलावर अडकलेला कचरा काढताना कुडचडे अग्निशामक दलाचे जवान)
गाळ उपसण्याची गरज
कुशावती नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून पावसाळ्यात पाणी लगेच भरत असल्याने नदीला पूर येतो. याचा जास्त फटका पारोडावासीयांना बसतो. गेल्या वर्षी तीनवेळा पारोडा पूल व रस्ता (Road) पाण्याखाली गेला होता. तसेच पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे पारोडा पुलाचे रेलिंग तुटले होते. त्यामुळे कुशावती नदीच्या पात्रातील गाळ उपसण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.