आदिवासींच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षाचे मोठे काम
पणजी : भाजपचा खरा 'डीएनए' हा आदिवासी समाजाचाच आहे. आदिवासी समाजाशी माझे रक्ताचे नाते नसले तरी सामाजिक व भावनिक नाते आहे. रक्ताचे नाते असलेले कितीतरी आले व गेले, अशा शब्दात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोविंंद गावडे यांच्या नावाचा उल्लेख न करता समाचार घेतला.
सांगे येथे आज 'धरती आभा जनभागिदारी' अभियानाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमास केंद्रीय आदिवासी खात्याचे मंत्री ज्युएल ओरॅम, सभापती रमेश तवडकर, समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार गणेश गावकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
आदिवासींसाठी सरकारचे महत्त्वपूर्ण काम
भारतीय जनता पक्षाच्या सरकारनेच आदिवासींच्या विकासासाठी काम केले आहे. माझ्या सरकारच्या काळात आदिवासी आयोग स्थापन झाला. रमेश तवडकर हे या आयोगाचे आयुक्त होते. आदिवासी महामंडळ स्थापन झाले. आदिवासींच्या समस्या व संस्कृती जाणून घेण्यासाठी आदिवासी संशोधन केंद्र स्थापन झाले. फर्मागुडी येथे आदिवासी म्युझियमचे काम सुरू आहे. काजूकट्टा येथे जाण्यासाठी रस्ता नव्हता, त्यामुळे ७ कोटी रुपये खर्च करून माझ्याच सरकारने रस्ता केला. आदिवासी समाजबांधवांच्या सशक्तीकरणासाठी बऱ्याच योजना आहेत. या योजनांची १०० टक्के कार्यवाही केली जाईल. १० हजार वन हक्क दाव्यांपैकी ३५०० दावे निकालात काढले आहेत. येत्या १९ डिसेंबरपर्यंत सर्व दावे निकालात काढले जातील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
तवडकरांचा गोविंद गावडेंवर निशाणा
कल्याणासाठी स्वतंत्र खाते तयार करून योजना मार्गी लावण्याचे काम भाजपने केले. भाजपने तयार केलेल्या पीचवर भाजपच्याच कार्यकर्त्यांनी बॅटींग करायला हवी होती. पण मध्येच भाजपशी काहीही संबंध नसलेला, अस्तित्वही नसलेला ‘कोणतरी’ येतो आणि बॅटींग करून निघून जातो. अशा लोकांची कीव येते, अशा शब्दात सभापती रमेश तवडकर यांनी देखील गावडेंचा समाचार घेतला.