कळंगुटमधील ‘गोल्ड टच’ स्पा पार्लरला भीषण आग; १० लाखांचे नुकसान

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
5 hours ago
कळंगुटमधील ‘गोल्ड टच’ स्पा पार्लरला भीषण आग; १० लाखांचे नुकसान

म्हापसा : कळंगुट येथील ‘गोल्ड टच दी लग्झरी स्पा’ या स्पा पार्लरला गुरुवारी सकाळी अचानक आग लागून संपूर्ण स्पा जळून खाक झाला. प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता असून, या दुर्घटनेत सुमारे १० लाखांचे आर्थिक नुकसान झाल्याचे समजते.

ही घटना सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण केले. ८.१५ च्या सुमारास पिळर्ण अग्निशमन दलाला याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमनचे जवान १५ मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या तत्काळ कारवाईने ही आग आटोक्यात आणण्यात आली.

आगीच्या तडाख्याने स्पामधील आठ खोल्यांतील गाद्या, टॉवेल, वातानुकूलित संच व इतर सामग्री पूर्णतः भस्मसात झाली. राकेश कोराडे यांच्या मालकीचा हा स्पा एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर होता. याच इमारतीच्या तळमजल्यावर असलेले रेस्टॉरन्ट मात्र अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे आगीपासून सुरक्षित राहिले.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पिळर्ण अग्निशमन अधिकारी दामोदर पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिकारी सनी फायदे, दिनेश गावडे, प्रितेश मालदार, श्रीकांत सावंत, प्रल्हाद कोटकर, राजकिरण पेडणेकर आणि म्हापसा अग्निशमनचे उपअधिकारी ज्ञानेश्वर सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी संयुक्त प्रयत्न केले. घटनेचा पंचनामा कळंगुट पोलिसांनी केला असून, आग लागण्याचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा