जसप्रीत बुमराह दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध

खेळण्याबाबत निर्णय अंतिम क्षणी : जोफ्रा आर्चर पुन्हा संघाबाहेर

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
5 hours ago
जसप्रीत बुमराह दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध

बर्मिंगहम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना २ जुलैपासून एजबेस्टन, बर्मिंगहम येथे खेळवला जाणार आहे. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा दुसऱ्या कसोटीसाठी खेळण्यास उपलब्ध असल्याचे भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनी स्पष्ट केले आहे.
बुमराहच्या वर्कलोड मॅनेजमेंटमुळे त्याला इंग्लंडविरुद्धच्या ५ कसोटींपैकी केवळ ३ सामनेच खेळवले जाणार आहेत. त्यामुळे तो दुसरा कसोटी सामना खेळणार नाही अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, रायन डोशेट यांनी स्पष्ट केले की, तो पूर्णपणे फिट आहे आणि दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध आहे.
डोशेट पुढे म्हणाले, आम्हाला सुरुवातीपासूनच माहिती आहे की बुमराह पाचपैकी तीनच सामने खेळेल. त्याने पहिला सामना खेळल्यानंतर रिकव्हरीसाठी आठ दिवस मिळाले आहेत. आता परिस्थिती, खेळपट्टी आणि पुढील सामने पाहता त्याच्यावर निर्णय घेतला जाईल. त्याला या सामन्यात खेळवायचे की लॉर्ड्स, मँचेस्टर किंवा ओव्हल येथे खेळवायचे, हे सगळे त्या क्षणीच्या गरजेनुसार ठरेल.
दुसऱ्या कसोटीसाठी भारताच्या सराव सत्रात बुमराह पूर्ण ताकदीने गोलंदाजी करताना दिसला. त्याचे गोलंदाजी करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाईल अशी अपेक्षा आहे. जर बुमराहला विश्रांती देण्यात आली, तर त्याच्या जागी मुकेश कुमार, अावेश खान किंवा उमेश यादव यापैकी कोणालातरी संधी दिली जाऊ शकते. सध्या मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग या दोन वेगवान गोलंदाजांचा समावेश निश्चित मानला जात आहे.
जरी बुमराह फिट आणि खेळण्यास सज्ज असला, तरी त्याला दुसऱ्या कसोटीत खेळवायचे की नाही, याचा निर्णय शेवटच्या क्षणी घेतला जाणार आहे. खेळपट्टीची स्थिती, इतर गोलंदाजांचा वर्कलोड आणि आगामी कसोट्यांची रणनीती यावर या निर्णयाचे भवितव्य ठरणार आहे. भारतीय संघाचे आणि चाहत्यांचे लक्ष आता कसोटीत जसप्रीत बुमराहच्या समावेशावर केंद्रित झाले आहे.
या सामन्याआधी इंग्लंड संघाने आपली प्लेइंग इलेव्हन दोन दिवस आधीच अधिकृतपणे जाहीर केली आहे. विशेष बाब म्हणजे, संघात एकही बदल करण्यात आलेला नाही, मात्र वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याच्या अनुपस्थितीमुळे इंग्लंडला धक्का बसला आहे.
जोफ्रा आर्चर याला चार वर्षांनंतर कसोटी संघात पुनरागमनाची संधी मिळाली होती. दुखापतीमुळे त्याला बराच काळ क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते. विशेष म्हणजे, त्याने शेवटचा कसोटी सामना भारताविरुद्धच खेळला होता आणि त्याचे पुनरागमनही भारताविरुद्धच होणार अशी शक्यता होती.
मात्र, कौटुंबिक आपत्कालीन परिस्थितीमुळे तो सराव सत्रातही सहभागी होऊ शकला नाही आणि त्यामुळे दुसऱ्या कसोटीतून तो बाहेर गेला आहे. संघ व्यवस्थापनानेही त्याच्या अनुपस्थितीची अधिकृत घोषणा केली आहे.
जोफ्रा आर्चरच्या अनुपस्थितीतही इंग्लंडने कोणत्याही नव्या खेळाडूचा समावेश केलेला नाही. पहिल्या कसोटीत जे ११ खेळाडू मैदानात उतरले होते, त्याच संघावर बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या कसोटीतही विश्वास दाखवण्यात आला आहे.
इंग्लंडची दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हन
झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्से, जोश टंग, शोएब बशीर

भारत ०-१ ने पिछाडीवर
पहिल्या कसोटीत भारताने चांगली फलंदाजी केली होती, मात्र निर्णायक क्षणी गोलंदाज अपयशी ठरल्याने संघाला ५ विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे मालिकेत भारत ०-१ ने पिछाडीवर आहे. दुसऱ्या कसोटीत भारत बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नशील असेल.