टीम इंडियाचे त्रिशतक फलकावर : जयस्वालचे अर्धशतक
बर्मिंगहॅम : एजबॅस्टन मैदानावरील आव्हानात्मक परिस्थितीत इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीपुढे भारताची आघाडीची फळी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली असताना, युवा सलामीवीर शुभमन गिलने आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीचा अप्रतिम अविष्कार सादर केला. प्रचंड दबाव झुगारून देत गिलने झळकावलेल्या शानदार शतकाच्या बळावर भारताने एजबॅस्टन कसोटीच्या पहिल्याच दिवशी सामन्यात दमदार पुनरागमन केले.
कर्णधार शुभमन गिलच्या शतकी खेळीमुळे भारताने ८२ षटकांत ३०० धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. गिल अजूनही खेळपट्टीवर स्थिरावला असून, त्याला रवींद्र जडेजाची चांगली साथ मिळत आहे. रवींद्र जडेजा अर्धशतकाच्या उंबरठ्यावर पोहोचला असून, तोही महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. पहिल्या दिवसाअखेरीस भारताने मजबूत स्थिती गाठल्याने सामन्यात रोमांच वाढला आहे.
तत्पूर्वी इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी भाग पाडले. भारताचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने या सामन्यात अप्रतिम सुरुवात केली. यशस्वीने लीड्समध्ये इंग्लंड विरुद्ध खणखणीत शतक ठोकले होते. यशस्वीला दुसऱ्या कसोटीतही शतक करण्याची संधी होती. मात्र शतक करण्यात तो अपयशी ठरला. यशस्वीने अर्धशतकी खेळीसह माजी कर्णधार रोहित शर्माचा रेकॉर्ड ब्रेक केला. यशस्वीने रोहितला सेना देशात सर्वाधिक ५०+ धावा करण्याबाबत मागे टाकले आहे.
ओपनर यशस्वीची तडाखेदार खेळी
माजी कर्णधार रोहित शर्माने ओपनर म्हणून सेना देशात (साऊथ आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) ४ वेळा ५०+ पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तर यशस्वीची ओपनर म्हणून ५० पेक्षा अधिक धावा करण्याची पाचवी वेळ ठरली.
यशस्वीने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात ५९ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. यशस्वीने अर्धशतकानंतर धावा करणे सुरुच ठेवले आणि सलग दुसऱ्या शतकाच्या जवळ येऊन पोहचला. मात्र यशस्वी शतकापासून १३ धावांनी दूर असतानाच बाद झाला. यशस्वीला इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने विकेटकीपर जेमी स्मिथच्या हाती झेलबाद केले. यशस्वीने १०७ चेंडूत ८७ धावा केल्या. यशस्वीने या खेळीत १३ चौकार ठोकले.
यशस्वीच्या इंग्लंड विरुद्धच्या धावा
हैदराबादमध्ये : ८०
विझागमध्ये : २०९
राजकोटमध्ये : २१४*
रांचीमध्ये : ७३
धरमशालामध्ये : ५७
लीड्समध्ये : १०१
एजबॅस्टनमध्ये : ८७
..........
सामन्यादरम्यान वेन लार्किन्सना आदरांजली
इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू वेन लार्किन्स यांच्या निधनामुळे कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी दोन्ही संघांनी काळ्या पट्ट्या बांधून मैदानावर प्रवेश केला. २८ जून रोजी लार्किन्स यांचे निधन झाले होते. दरम्यान, सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी राष्ट्रगीतानंतर दोन मिनिटांचे मौन पाळत त्यांना श्रद्धांजली वाहिली.