पक्ष समितीच्या अहवालानुसार अंतिम निर्णय
पणजी : येत्या जिल्हा पंचायत निवडणुकीत रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्ष (आरजीपी) उमेदवार उभे करण्याचा विचार करत आहे. याबाबत सध्या आमची चाचपणी सुरू आहे. आम्ही लोकांची मते विचारात घेत आहोत. लोकांचे प्रश्न घेऊन लढत आहोत, त्यातूनही आम्हाला काही गोष्टी समजून आल्या आहेत. यानंतर पक्ष समितीच्या अहवालानुसार याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांनी सांगितले. शुक्रवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
परब म्हणाले की, जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आप, काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांसोबत बोलणी करण्यापूर्वी आमच्या काही अटी असतील. हे पक्ष गोमंतकीय कोण याची व्याख्या करण्यास तयार असल्यास तसेच ते ‘पोगो’ विधेयकावर सकारात्मक असतील, तरच याविषयी आम्ही पुढील चर्चा करणार आहोत. आप नेते काँग्रेसवर टीका करत आहेत. काँग्रेसला भाजपची बी टीम म्हणत आहेत. यामुळे काही वर्षांपूर्वी असणारी इंडिया आघाडी सध्या कुठे आहे, हे आधी स्पष्ट करावे.
खासदार विरियातो फर्नांडिस यांनी केलेल्या टीकेवर परब यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, फर्नांडिस हे विश्वासघातकी आणि स्वार्थी राजकारणी आहेत. त्यांनी स्वतःला काँग्रेसचे तिकीट मिळावे म्हणून ‘गोंयचो आवाज’ नावाखाली चळवळ केली आणि तिकीट मिळाल्यावर या संघटनेला ते विसरले. त्यांनी आधी विजय सरदेसाईंवर टीका केली. लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांचीच मदत घेऊन कँपेन केले. स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी जनतेचा, धर्माचा वापर करणाऱ्या राजकारण्यांपासून लोकांनी सावध राहावे.