शिक्षण संचालकांनी हायस्कूल व्यवस्थापनाकडे मागितला अहवाल
पणजी : सांत इस्तेव येथील सेंट तेरेझा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना केलेल्या मारहाण प्रकरणी क्लॅन्सी डिसील्वा (बिठ्ठोण - पर्वरी) या शिक्षिकेला जुने गोवे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेत अटक केली. अटकेनंतर तिची जामिनावर सुटका करण्यात आली. दरम्यान, शिक्षण संचालकांनी मारहाणप्रकरणी सेंट तेरेझा हायस्कूलच्या व्यवस्थापनाकडे अहवाल मागितला आहे.
सेंट तेरेझा हायस्कूलमधील (Highschool) क्लॅन्सी डिसील्वा या शिक्षिकेने मुलांना शिवीगाळ केली आणि काठीने मारहाण केली, अशी तक्रार जुने गोवे पोलिसांत नोंद झाली आहे. मुलाच्या हातावर काठीचे वळ दिसल्याने मारहाणीचा प्रकार पालकांच्या लक्षात आला. माशेल - फोंडा (Ponda) येथील पीडित मुलाच्या आईने तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी गुन्हा नोंद करून संशयित शिक्षिकेला अटक केली. नंतर तिची जामिनावर मुक्तता करण्यात आली.
दरम्यान, पोलिसांत (Police) झालेली तक्रार व बातम्या आल्यानंतर शिक्षण संचालकांनी सेंट तेरेझा हायस्कूलच्या व्यवस्थापनाकडे अहवाल मागितला आहे. व्यवस्थापनाने चौकशी करून अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. सर्वप्रथम शिक्षिकेवर व्यवस्थापनाने कारवाई करायला हवी. कारवाई केल्यानंतर तिला शिक्षण संचालनालयाकडून मान्यता घ्यावी लागते.
अनुदानित शिक्षण संस्था असल्याने व्यवस्थापनाच्या शिफारसी शिवाय थेट शिक्षण संचालनालय कारवाई करू शकत नाही. तसेच निलंबन वा बडतर्फी शिक्षण संचालकांच्या मान्यतेशिवाय होऊ शकत नाही, अशी माहिती शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी दिली आहे.