पणजी : बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन हडप करणाऱ्यांविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जोरदार मोहीम सुरू केली असून, या तपासाला आता अधिक वेग मिळाला आहे. शुक्रवारी (४ जुलै) सकाळी ६ वाजता सुकुरचे माजी सरपंच संदीप वझरकर यांच्या पर्वरी येथील घरी ईडीने पुन्हा छापा टाकला. यापूर्वी वझरकर यांच्याशी संबंधित अंदाजे ३.१९ कोटी रुपयांची ७,९७५ चौरस मीटर जमीन जप्त करण्यात आली होती.
ईडीने अन्य एका प्रकरणात तब्बल २३२ कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या मालमत्ता तात्पुरत्या व कायमस्वरूपी जप्त केल्या आहेत. बार्देश तालुक्यातील आसगाव, हणजूण, कळंगुट, नेरुल आणि पर्रा परिसरातील एकूण २४ मालमत्ता तात्पुरत्या जप्त करण्यात आल्या आहेत. या जमिनींची अंदाजे किंमत १९३.४९ कोटी रुपये आहे. त्याशिवाय, १५ एप्रिल २०२४ रोजी ३९.२४ कोटींच्या ३१ मालमत्ता कायमस्वरूपी जप्त करण्यात आल्या.
अशाच एका जमीन हडप प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या ११.८२ कोटींच्या मालमत्तेचीही नोंद आहे. मोहम्मद सुहैल उर्फ मायकल, विक्रांत शेट्टी, राजकुमार मैथी यांच्याविरोधातही गंभीर आरोप असून, त्यांच्यासह ३६ जणांविरोधात म्हापसा येथील विशेष पीएमएलए न्यायालयात सुमारे ७४०० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यामध्ये ३६ साक्षीदारांचीही नोंद आहे.
ईडीच्या तपासानुसार, या सर्वांनी बनावट कागदपत्रांद्वारे जमीन हडप केल्याचा संशय असून, आर्थिक गुन्हे शाखा (ईओसी) व विशेष तपास पथकाने (एसआयटी) २०२२ पासून या प्रकरणात ५१ गुन्हे दाखल करून चौकशी सुरू केली आहे.
एप्रिल महिन्यात शेवटच्या आठवड्यात ईडीने व्यावसायिक रोहन हरमलकर याच्या गोव्यातील पिळर्ण, पर्वरी, दिवाडी आदी ठिकाणी छापे टाकले होते. त्यावेळी अंदाजे १६०० कोटी रुपये किमतीची कागदपत्रे जप्त करण्यात आली. यामध्ये १००० कोटी रुपयांच्या जमिनींची बनावट कागदपत्रे व ६०० कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तांची अस्सल कागदपत्रेही समाविष्ट होती.
ईडीच्या या सखोल कारवायांमुळे राज्यातील जमीन घोटाळ्यांची मुळे खोलवर तपासली जात असून, दोषींवर कडक कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.
( बातमी अपडेट होत आहे. )