वास्कोतील १.०५ कोटींच्या मालमत्ता तात्पुरत्या जप्त
पणजी : सडा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड (SUCCSL) मधील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) पणजी विभागीय कार्यालयाने ३ जुलै रोजी वास्को येथील एकूण १.०५ कोटी रुपयांच्या दोन स्थावर मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्या आहेत. ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा २००२ अंतर्गत करण्यात आली आहे.
या प्रकरणात झुआरीनगर शाखेच्या तत्कालीन शाखा व्यवस्थापक उमा निलेश होंडाड उर्फ उमा राजू हेलवार आणि इतरांविरुद्ध गोवा पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआर आणि चार्जशीटच्या आधारे ईडीने चौकशी सुरू केली होती. त्यांच्यावर सोसायटीच्या १.२८ कोटी रुपयांच्या निधीचा अपहार, फसवणूक आणि बनावट दस्तऐवज तयार करण्याचे आरोप आहेत.
ईडीच्या तपासात उघड झाले आहे की, उमाने आपल्या पदाचा गैरवापर करत इतरांच्या संगनमताने बनावट कर्जखाते उघडून, गोल्ड लोनची प्रकरणे दाखवून, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून सोसायटीच्या बँक खात्यातून पैसे काढले. या सर्व गैरव्यवहारातून मिळालेला निधी त्यांनी स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या वैयक्तिक खात्यात वळवला. यानंतर हा निधी वैयक्तिक खर्च व मालमत्ता खरेदीसाठी वापरण्यात आला.
जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये वास्को शहरातील ‘वास्को टाइम्स’ नावाचे एक व्यावसायिक दुकान आणि एक रहिवासी घर यांचा समावेश आहे.
संदीप वझरकरच्या घराची ईडीकडून झडती
दरम्यान बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन हडप करणाऱ्यांविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी सकाळी ६ वाजता सुकूरचे माजी सरपंच संदीप वझरकर यांच्या पर्वरी येथील घरावरही छापा टाकला. यापूर्वी वझरकर यांच्याशी संबंधित अंदाजे ३.१९ कोटी रुपयांची ७,९७५ चौरस मीटर जमीन जप्त करण्यात आली होती.