फोंडा : पार्किंगच्या वादातून उसगाव येथील संदेश गावकर याच्यावर प्राणघातक हल्ला केलेला सराईत गुन्हेगार (हिस्ट्रीशिटर) व त्याच्या मित्रांना अटक करण्यात फोंडा पोलिसांना यश आले आहे.
रविवारी रात्री नेस्ले फॅक्टरीजवळ सचिन कुट्टीकर (३५, रा. उसगाव तिस्क) याने पार्किंगच्या वादातून संदेश गावकर याच्याकडे हुज्जत घातली. त्याने आपला मित्र व हिस्ट्रीशिटर अमोघ नाईक (३९, रा. बोरी) याला तिथे बोलावून घेतले. अमोघने लगेचच त्याचा मित्र विशाल आमोणकर (३४, रा. बोरी) व अन्य काही साथीदारांसह उसगाव येथे धाव घेतली व संदेश याच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. गंभीर अवस्थेत संदेश याला गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. मारहाण झालेल्या दिवसापासून सर्वजण फरार झाले होते. फोंडा पोलिसांनी त्यांना शिताफीने अटक केली आहे.