फॅन हलविल्याच्या कारणावरून हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण

हणजूण पोलिसांकडून पाच जणांना अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
6 hours ago
फॅन हलविल्याच्या कारणावरून हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण

म्हापसा : हणजूण येथील फिशरमेन व्हिलेज रेस्टॉरन्टच्या कर्मचारी निवास खोलीच्या दरवाजावरील फॅन हलवल्याच्या कारणावरून रेस्टॉरन्टचे स्वयंपाकी व इतर कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी हणजूण पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

रोहीत दीपक कांबळी (१९, रा. खलपवाडा, काणका बार्देश), आदित्य अनंत मानोलकर (२४, रा. फिशरमेन रेस्टॉरन्ट व मूळ खानापूर), किरण महादेव पवार (२३), विक्रम शंकर चौधरी (२०) व किरण दीपक कांबळी (२३, सर्व रा. खलपवाडा काणका) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

ही घटना मंगळवार, १ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी फिशरमेन व्हिलेज रेस्टॉरन्टचे कूक मनोज कुमार (रा. मूळ उत्तर प्रदेश) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

घटनेवेळी संशयित आरोपी आदित्य मानोलकर याने आपला मित्र रोहीत कांबळी याला खोलीवर आणले होते. ते तिथे दारू पीत बसले होते. ही खोली रेस्टॉरन्ट मालकाने कामगारांना निवासासाठी दिली होती. त्यामुळे तिथे सर्व कर्मचारी राहत होते. फॅनमुळे दरवाजा उघडत नसल्याने फिर्यादी मनोज कुमार याने हा फॅन जरासा हलवला. यावरून संशयित रोहीत व आदित्य यांनी फिर्यादींशी वाद घातला आणि त्याला मारहाण केली. यावेळी संशयित रोहीत याने हातातील लोखंडी कड्याच्या सहाय्याने मनोज याच्या डोक्यावर हल्ला केला. त्यात तो जखमी झाला. इतर कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून तिघांनाही बाजूला केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीला उपचारार्थ इस्पितळात दाखल केले. पोलिसांनी भा.न्या.सं.च्या ३५२, ११५ (२), ११८ (२) व ३ (५) कलमान्वये गुन्हा नोंद करून संशयित आरोपींना बुधवारी २ रोजी दुपारी पकडून अटक केली.

संशयित आरोपींना म्हापसा न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सूरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नवनीत गोलतेकर हे करीत आहेत.

मध्यस्थी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मारहाण

रोहीतने फोन करून आपला भाऊ किरण कांबळीला बोलावले असता तो विक्रम चौधरी व किरण पवार या दोघांना घेऊन तिथे दाखल झाला. नंतर सर्वांनी मनोजसह मध्यस्थी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली. 

हेही वाचा