वास्को : सांकवाळ येथील पिकॉक व्हॅलीच्या मोकळ्या जागेत सात वाहनांसह जप्त करण्यात आलेल्या सर्व सिलिंडरांची वजन व माप विभागातर्फे गुरुवार, दि. ३ रोजी वजन व तपासणी करण्यात आली. वजन व माप खात्याचे वास्को विभागाचे निरीक्षक लिलाधर कुंभारजुवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वास्को व मडगाव विभागातील कर्मचाऱ्यांनी सिलिंडरांचे वजन केले.
सिलिंडरांची मोजणी करण्यात आल्यावर ते १०२१ असल्याचे स्पष्ट झाले. त्यामध्ये ९६४ बीपीसीएलचे तर ५७ एचपीसीएलचे आहेत. त्यापैकी ४८५ सिलिंडर रिकामे आहेत.
नागरी पुरवठा खात्याच्या भरारी पथकाने मंगळवारी सांकवाळ येथील पिकॉक व्हॅलीच्या मोकळ्या जागेत छापा घातला होता. त्यावेळी भरारी पथकाच्या हाती दोन मोठे ट्रक, चार पिकअप व एक इतर वाहन अशी सात वाहने लागली. तसेच तेथे गॅसने भरलेले व रिकामे असलेले सुमारे एक हजारापेक्षा अधिक घरगुती, व्यावसायिक सिलिंडर मिळाले होते. याप्रकरणी वेर्णा पोलिसांना माहिती देण्यात आल्यावर सदर वाहने व सिलिंडर जप्त करण्यात आले होते. या सिलिंडरांची गुरुवारी वजन व माप खात्यातर्फे वजन करण्यात आले. त्यामध्ये बीपीसीएलचे १४.२ किलोग्रॅम वजनाचे ४४४ घरगुती गॅस सिलिंडर तर १९ कि.ग्रॅ. वजनाचा एक व्यावसायिक सिलिंडर सीलबंद असल्याचे तर १९ कि.ग्रॅ. वजनाचे १९ सिलिंडरांचे सील उघडण्यात आल्याचे उघड झाले. पाच कि.ग्रॅ. (एफ टीएल) वजनाचे २ व्यावसायिक सिलिंडर सीलबंद होते. तर ५ सिलिंडरांचे सील उघडण्यात आली होती. एचपीएलच्या पाच कि.ग्रॅ. वजनाचे (एफटीएल) १९ सिलिंडर सीलबंद तर चार सिलिंडराचे सील उघडण्यात आली होती. बीपीसीएलच्या १९ कि.ग्रॅ. (बीएमसीजी) वजनाच्या १२ सिलिंडरांची सील बंद होती, तर १८ सिलिंडरांची सील उघडण्यात आली होती. बीपीसीएल १४.२ कि.ग्रॅ. वजनाच्या सहा सिलिंडरांची सील उघडण्यात आले होते.
वजन व माप खाते आपला अहवाल वास्कोचे उपविभागीय पोलीस अधिकारी गुरुदास कदम यांना देणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई होईल असे समजते. वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक आनंद शिरोडकर, उपअधीक्षक गुरुदास कदम तपास करीत आहेत.