गोवा : शाळांसह पावसानेही घेतली ‘सुट्टी’

राज्यात बहुतेक ठिकाणी ऊन-पावसाचा खेळ

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
8 hours ago
गोवा : शाळांसह पावसानेही घेतली ‘सुट्टी’

पणजी : राज्यात दोन दिवस जोरदार हजेरी लावलेल्या पावसाने शुक्रवारी काहीशी उघडीप घेतली. बहुतेक ठिकाणी दिवसभर ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. हवामान खात्याने राज्यात शनिवार दि. ५ जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यानुसार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ६ ते १० जुलै दरम्यान मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून या पाच दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

दरम्यान, पावसाने दडी मारल्याने राज्यातील कमाल तापमानात वाढ झाली. चोवीस तासांत पणजीतील कमाल तापमान ३ अंशांनी वाढून ३० अंश सेल्सिअस झाले, तर किमान तापमान २४.१ अंश सेल्सिअस होते. मुरगावमधील कमाल तापमान २७.६ अंश, तर किमान तापमान २४.६ अंश सेल्सिअस राहिले. पुढील सहा दिवस राज्यातील कमाल तापमान २८ ते ३० अंश, तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता खात्याने व्यक्त केली आहे.

राज्यात चोवीस तासांत सरासरी २.३४ इंच पावसाची नोंद झाली. यादरम्यान धारबांदोडामध्ये ३.९० इंच, सांगेत ३.७९ इंच, केपेत २.७५ इंच पाऊस पडला. १ जून ते ४ जुलैदरम्यान सरासरी ४२.७९ इंच पावसाची नोंद झाली आहे. यंदा पावसाचे प्रमाण २.२ टक्क्यांनी अधिक आहे. या काळात धारबांदोडामध्ये सर्वाधिक ६३.२७ इंच पावसाची नोंद झाली आहे, तर सांगे येथे ५४.२८ इंच, वाळपईमध्ये ५२.०५ इंच, फोंडा मध्ये ५०.०८ इंच, तर केपेमध्ये ४५.९८ इंच पावसाची नोंद झाली आहे.        

हेही वाचा