अधिसूचना जारी : देखभाल भत्ता, अनुदानातही वाढ
पणजी : आदिवासी कल्याण खात्यातर्फे एसटी समाजातील होम नर्सिंग अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीत दुपटीने वाढ करण्यात आली आहे. यानुसार प्रमाणपत्र अभ्यासक्रम, पदविका, पदवी आणि आरोग्य सेवक अभ्यासक्रमासाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती वाढवण्यात आली आहे. याशिवाय देखभाल भत्ता आणि एकवेळ देण्यात येणाऱ्या अनुदानात देखील वाढ करण्यात आली आहे. याबाबत खात्यातर्फे नुकतीच अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
यापूर्वी होम नर्सिंगचा सहा महिन्यांवरील कोर्स करणाऱ्या एसटी विद्यार्थ्यांना ३५०० रुपये दिले जात होते. आता यात बदल करून ७ हजार रुपये देण्यात येणार आहेत. एक किंवा त्याहून अधिक वर्षांचा पदविका अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना ५ हजार ऐवजी १० हजार रुपये मिळणार आहेत. तीन वर्षांची पदवी करणाऱ्या विद्यार्थ्यांना १० हजार ऐवजी २० हजार रुपये देण्यात येतील, तर आरोग्य सेवक अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना ३५०० रुपये देण्यात येत होते. यापुढे ७ हजार रुपये दिले जातील.
याआधी विद्यार्थ्यांना ५०० रुपये, तर हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना ८०० रुपये देखभाल भत्ता मिळत होता. तो वाढवून आता अनुक्रमे एक हजार आणि १६०० रुपये करण्यात आला आहे. तसेच सहा महिन्यांवरील कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेश व स्टेशनरी घेण्यासाठी एकदा एक हजार रुपये दिले जात होते. आता ते वाढवून २ हजार रुपये केले आहेत. एक किंवा त्याहून अधिक वर्षांचा पदविका अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना २ हजार ऐवजी ४ हजार रुपये मिळणार आहेत. तीन वर्षांची पदवी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ३ हजार ऐवजी ६ हजार रुपये देण्यात येतील, तर आरोग्य सेवक अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना ४ हजार रुपये देण्यात येतील.
चार सदस्यीय समिती स्थापन
नवीन योजना शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून लागू होणार आहे. इच्छुकांनी सीएम पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरणे आवश्यक आहे. यासोबत जात प्रमाणपत्र, गुणपत्रक, आधार कार्ड, बँक पासबुक आणि उत्पन्न प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येईल. या योजनेसाठी खात्याने चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे. खात्याचे संचालक सदस्य, तर खात्याचे सचिव अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. ही योजना पुढील पाच वर्षांसाठी सुरू राहणार आहे.