'भाजपची विचारधारा स्वीकारा, शिस्त पाळा', अन्य पक्षातून आलेल्यांना प्रदेशाध्यक्षांचा सल्ला
मडगाव : 'पत्रकार समोर आल्यानंतर दुसर्या दिवशी फ्रंटपेजवर आपली बातमी येईल अशा उद्देशाने सार्वजनिक वक्तव्ये करणे हे योग्य नाही. हे वागणे भाजपच्या शिस्तीच्या विरोधात आहे. काही वाद असतील तर ते पक्षाकडे येऊन मिटवावेत,' असा सल्ला भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक (Damu Naik) यांनी दिला. तसेच दुसर्या पक्षातून आलेल्यांनीही भाजपच्या शिस्तीत राहून काम करावे, अशी कानउघडणीही नाईक यांनी केली आहे.
राज्यातील काही नेत्यांनी नुकतीच एकमेकांवर केलेल्या टिप्पणी बाबत विचारणा केल्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले, 'लोकशाहीत सर्वांना आपले मत मांडण्याचा अधिकार दिला असला तरी कुणालाही कायदा हातात घेण्याची परवानगी दिलेली नाही. भारतीय जनता पक्षातील (Bharatiya Janata Party) आमदारांमध्ये किंवा नेत्यांमध्ये आपापसात काही वाद असतील तर त्यांनी आपले म्हणणे योग्य व्यासपीठावर मांडणे गरजेचे आहे. कुणी वादग्रस्त विधान केले असल्यास त्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करून समज देण्यात येते. पक्षाकडून प्रत्येकाचे म्हणणे ऐकले जाते व त्यांना वाद मिटवण्यासाठी सांगण्यात येते. सार्वजनिक ठिकाणी एकमेकांवर टिप्पणी करणे योग्य नाही. काहीवेळा प्रसिद्धीसाठी काही विधाने केली जातात. अशा सर्वांना वेळोवेळी योग्य व्यासपीठावर येऊन त्यांचे म्हणणे मांडून वाद मिटवण्याच्या सूचना केल्या आहेत.
भाजपच्या विचारधारेनुसार काम करावे
दुसर्या पक्षातून भाजपमध्ये अनेक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. त्या सर्वांना वारंवार सूचना करण्यात आल्या आहेत. दुसऱ्या पक्षातून आलेल्यांनी आधीची विचारधारा सोडून आता भारतीय जनता पक्षाची विचारधारा (PartyCodeOfConduct) स्वीकारावी. पक्षाच्या शिस्तीत राहून काम करावे. भाजप हा परिवार असून प्रत्येकाने इथे सदस्य बनून राहावे, असा सल्ला नाईक यांनी दिला.