बॅरिकेस्ट लावून एकेरी वाहतूक सुरू
जोयडा : बेळगाव- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अनमोड घाटात दूधसागर मंदिरालगत गोवा हद्दीतील महामार्गाच्या एका बाजूला भेगा पडल्या असून कोणत्याही क्षणी भूस्खलन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सद्यस्थितीत भेगा पडलेल्या ठिकाणी गोवा पोलिसांनी बॅरिकेस्ट लावून एकेरी वाहतूक सुरू केली आहे.
बेळगाव - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अनमोड घाट हा कर्नाटक आणि गोवा राज्याला जोडणारा महत्त्वाचा घाटमार्ग आहे. दरवर्षी पावसाळ्यात या घाटात दरड कोसळण्याचा धोका असतो. अशातच आता अनमोड घाटात दूधसागर मंदिरापासून गोव्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुमारे ५० मीटर मार्गावर भेगा पडल्या असून या घाटातून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे.
घाटात वाहतूक कोंडी..!
महामार्गाला भेगा पडल्याची माहिती मिळताच गोवा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बॅरिकेट्स लावून या ठिकाणाहून एकेरी वाहतूक सुरू ठेवली आहे. त्यामुळे घाटात वाहतूक कोंडी होऊन रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. भेगा पडलेल्या रस्त्याच्या बाजूला दरी असून भूस्खलन झाल्यास रस्ता बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.