आल्तिनो, जुन्या सचिवालयासह सरकारी निवासी गाळ्यांमध्ये चालणार कामकाज
पणजी : जुन्ता हाऊस इमारत खाली करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर, त्या इमारतीमधील सरकारी कार्यालयांचे स्थलांतर वेगाने सुरू झाले आहे. ही कार्यालये आल्तिनो, जुन्या सचिवालयात तसेच सरकारी निवासी गाळ्यांमध्ये हलवली जाणार आहेत. ही इमारत ३० दिवसांच्या आत रिकामी करण्याचे आदेश असल्याने सामान्य प्रशासन विभाग आणि विविध खात्यांच्या प्रमुखांची धावपळ उडाली आहे.
गोवा मुक्तीनंतर सरकारी कार्यालयांसाठी जुन्ता हाऊस इमारतीचे बांधकाम झाले होते. एकेकाळी पणजीमधील सर्वांत उंच आणि प्रशस्त इमारत अशी तिची ओळख होती. या इमारतीच्या सहा मजल्यांवर अनेक सरकारी कार्यालये होती. यामुळे अधिकारी, कर्मचारी आणि सामान्य नागरिकांची येथे नेहमीच वर्दळ असायची.
सध्या या इमारतीत सुमारे २० कार्यालये आहेत. काही वर्षांपूर्वी पाणीपुरवठा, नियोजन आणि सांख्यिकी, तिळारी महामंडळ यासारखी काही कार्यालये पर्वरी आणि इतर ठिकाणी स्थलांतरित झाली होती. तरीही पंचायत, वाहतूक, राजभाषा, सार्वजनिक बांधकाम आणि खादी ग्रामोद्योग यांसारखी महत्त्वाची कार्यालये अजूनही येथेच कार्यरत आहेत. तळमजल्यावर सहकार भांडार, राज्य सहकारी बँकेसह काही दुकानेही आहेत. आता ही इमारत असुरक्षित घोषित झाल्याने कार्यालयांसह दुकानेही रिकामी करावी लागणार आहेत.
जुन्ता हाऊसमधील काही कार्यालये आल्तिनो येथील वन भवन आणि कर भवन इमारतीत स्थलांतरित केली जातील. वन संरक्षक आणि रेंज फॉरेस्ट कार्यालय वन भवनात हलवले जाईल. काही कार्यालये जुन्या सचिवालयात हलवण्यात येतील, जिथे पहिल्या मजल्यावर कार्यालयांसाठी जागा उपलब्ध आहे. पणजी मार्केटमधील प्रशासकीय लवादाच्या कार्यालयात ग्राहक मंच कार्यालय नेण्याचा प्रस्ताव आहे.
याशिवाय काही कार्यालये रिकाम्या असलेल्या सरकारी निवासी गाळ्यांमध्ये हलवण्याचा विचार सुरू आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून निवासी गाळ्यांची पाहणी सुरू आहे. नागरी पुरवठा खाते वागळे इमारतीजवळील जुन्या न्यायालयाच्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचाही प्रस्ताव आहे.
विविध खात्यांच्या प्रमुखांनी नव्या जागांची पाहणी केली असली, तरी अद्याप कोणते कार्यालय कुठे स्थलांतरित होणार यावर अंतिम निर्णय झालेला नाही. खात्यांच्या प्रमुखांनी जागांची पाहणी करून मान्यता दिल्यानंतरच कार्यालयांसाठी जागा निश्चित केल्या जातील.
जुन्ता हाऊसमधील प्रमुख कार्यालये
पहिल्या मजल्यावर : वाहतूक, बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी पुरवठा, फास्ट ट्रॅक कोर्ट, वन विकास महामंडळ, रेंज फॉरेस्ट कार्यालय, ग्राहक तंटा आयोग, वन्यजीव संरक्षक कार्यालय, राजभाषा संचालनालय.
दुसऱ्या मजल्यावर : खादी ग्रामोद्योग, गोवा गॅझेटियर, महिला आयोग, उत्तर गोवा जिल्हा पंचायत.
चौथ्या मजल्यावर : बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंते (इमारत), सहाय्यक अभियंते (इमारत), सहाय्यक वर्क्स सर्वेयर, कार्यकारी अभियंते (रस्ते), उत्तर गोवा जिल्हा सहकार निबंधक, सहाय्यक अभियंते (रस्ते), गटविकास अधिकारी आणि ओम्बुडसमॅन.