स्वच्छ पाणी न मिळाल्यास मोर्चाचा काँग्रेसचा इशारा
म्हापसा येथील पेयजल पुरवठा खात्याच्या सहाय्यक अभियंत्यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना काँग्रेस सरचिटणीस विजय भिके. बाजूस गटाध्यक्ष मिताली गडेकर व इतर.
म्हापसा : येथील शहरासह बार्देश तालुक्यात सध्या गढूळ पाणी पुरवठा होत आहे. परिणामी रोगराईला आमंत्रण मिळत असून जनतेला स्वच्छ आणि नियमित पाणी पुरवठा आठवड्याभरात न मिळाल्यास पेयजल पुरवठा खात्यासह उपसभापतींच्या कार्यालयावर बादली मोर्चा काढू, असा इशारा काँग्रेसचे सरचिटणीस विजय भिके यांनी दिला आहे.
म्हापसा येथील पेयजल पुरवठा खात्याच्या कार्यालयात विजय भिके, काँग्रेस म्हापसा गटाध्यक्ष मिताली गडेकर व इतरांनी सहाय्यक अभियंता रोहिदास नाईक यांची भेट घेतली. सोबत त्यांनी नळाद्वारे येणारे गढूळ पाणी भरलेल्या बाटल्या आणल्या होत्या. यावेळी कनिष्ठ अभियंता प्रज्योत नाईक उपस्थित होते.
नळाला गढूळ येण्याचे कारण भिके यांनी सहाय्यक अभियंत्यांना विचारले. खोदकामावेळी जलवाहिन्या फोडल्या जात असल्याने सदर मातीमिश्रित पाणी नळाला येते, असे उत्तर त्यांनी दिले. शिवाय म्हापशातील खोर्ली, गावसावाडा, हणजूण, आसगाव व इतर भागात होणारऱ्या अनियमित पाणी पुरवठ्याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
येत्या आठ दिवसांत लोकांच्या नळाला स्वच्छ पाणी आणि नियमित पाणी पुरवठा द्यावा. तसे न झाल्यास पेयजल पुरवठा कार्यालयावर मोर्चा आणू तसेच म्हापसाच्या आमदारांच्या कार्यालयावर बादली मोर्चा नेण्यात येईल, असा इशारा भिके यांनी दिला.
फुटलेल्या जलवाहिन्यांतून गढूळ पाणी!
पेयजल खाते, वीज तसेच इतर खात्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे खोदकाम करून वारंवार जलवाहिन्या फोडल्या जातात. नंतर या फुटलेल्या वाहिन्यांतून नळाला गढूळ पाणी येते. यातून रोगराई पसरते. राज्यात मुसळधार पाऊस पडून देखील काही भागांतील नळांना पाणी येत नाही. नळ असून स्वच्छ पाणी नाही, त्यामुळे ‘हर घर नल से जल’ची सरकारची योजनाच भूलथाप आहे, असा आरोप विजय भिके यांनी केला.