चोडण येथे बुडाली होती फेरीबोट : दुरुस्तीसाठी बेती येथील वर्कशॉपमध्ये
पणजी : चोडण फेरी धक्क्याजवळ ११ दिवसांपूर्वी बुडालेली फेरीबोट पाण्याबाहेर काढण्यास अखेर नदी परिवहन खात्याने केलेल्या अथक प्रयत्नांना यश आले. ही फेरीबोट आता दुरुस्तीसाठी बेती येथील खात्याच्या वर्कशॉपमध्ये नेण्यात आली आहे.
गेल्या २३ जून रोजी रात्रीच्या वेळी ही फेरीबोटी नदीच्या पाण्यात बुडाली होती. अनेक दिवस प्रयत्न करूनही ती फेरीबोट पाण्याखालून वर काढण्यास नदी परिवहन खात्याला यश येत नव्हते. ही फेरीबोट पुन्हा पाण्यावर तरंगण्यासाठी क्रेनसह इतर आवश्यक यंत्रणा तैनात केली होती. तज्ज्ञांच्या मदतीने केलेल्या प्रयत्नांना शेवटी यश मिळाले.
ही फेरीबोट बाहेर काढताना पाणबुड्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. याकामी पाणबुडे नदीच्या पाण्याखाली जाऊन काम करत होते. पण फेरीबोट बुडालेल्या जागेवर नदीत चिखल असल्यामुळे गढूळ पाण्यात पाणबुड्यांना स्पष्ट काहीही दिसत नव्हते.
सुरक्षिततेच्या दृष्टीने होणार कसून तपासणी
ही फेरीबोट शुक्रवारी सकाळी १०.१५ वाजता पुन्हा पाण्याबाहेर काढण्यास खात्याला यश आले. त्यानंतर ही फेरीबोट दुसऱ्या फेरीबोटीला बांधून बेती येथील वर्कशॉपमध्ये नेण्यात आली. तेथे या फेरीबोटीची दुरुस्ती केली जाईल आणि झालेल्या नुकसानीचे सखोल विश्लेषण केले जाईल. ही फेरीबोट पुन्हा सेवेत कार्यरत करण्यापूर्वी सुरक्षिततेच्या दृष्टीने कसून तपासणी केली जाईल, असे खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.