अभ्यासक्रमात वारसा शिक्षणाचा समावेश करा !

गोवा वारसा धोरण अधिसूचित : वारसा मंडळ स्थापन करण्याची शिफारस


5 hours ago
अभ्यासक्रमात वारसा शिक्षणाचा समावेश करा !

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : अभ्यासक्रमात वारसा शिक्षणाचा समावेश करण्यासह वारसा मंडळ स्थापन करण्याची शिफारस गोवा वारसा धोरणात केली आहे. गोव्याची संस्कृती, वारसा स्थळे, ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन व विकास करण्याच्या हेतूने तयार झालेल्या गोवा वारसा धोरणाची अधिसूचना जारी झाली आहे. या धोरणात विविध तालुक्यांतील २६५ वारसास्थळे, १२२ वारसा घरे, ५० एेतिहासिक स्थळे आणि ४६ लोककलांचा उल्लेख आहे. ज्या पारंपरिक व्यवसायांचे रक्षण होणे आवश्यक आहे, अशा ६१ व्यवसायांची सूची धोरणात आहे.
वारसा स्थळांवर होणाऱ्या अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याची शिफारस धोरणात आहे. खासगी वारसा मालमत्तेच्या रक्षणासाठी अार्थिक मदत देण्यासह वारसा मालमत्तेची नोंदणी करण्याची शिफारस आहे.
विविध तालुक्यांतील वारसा स्थळे
पेडणे : म्हारींगणाची राय, भूतनाथ प्रार्थनास्थळाचे अवशेष, कावी कलेचे क्षेत्रपाल देऊळ, हरीहर देऊळ (पार्से), तेरेखोल गुहा, केरी गुहा, आगारवाड्याची मीठागरे, पीर दर्गा (कोरगाव), देवसू मशीद.
बार्देश : पोर्तुगीज काळातील दगडावरील शिल्प (हणजूण), पठारावरील दगडी शिल्प (सुकूर), रेईश मागूश चर्च (वेरे), सेंट फ्रान्सिस चर्च (कोलवाळ), सेंट जेरोम चर्च (म्हापसा), होली ट्रीनिटी चर्च (नागवा).
डिचोली : सिद्धाची राय शिवलिंग (लाटंबार्से), झाडामधील नारायण शिल्प (नानोडा), दिवगाळी दगडी गुहा (मये), चार हातांचा गणपती (कुडणे), क्षेत्रपालाची राय (मुळगाव), सप्तकोटेश्वर मंदिराबाजूचा बोगदा (नार्वे), वल्लभाचार्य बैठक (कुडणे), सियाचो बांध (सुर्ला)
सत्तरी : म्होवाचो गुणो (करंजोळ), सप्तमातृका शिल्प (झर्मे), काळेरान गुहा (सोनाळ), पोर्तुगीज काळातील कारागृह (माळोली)
तिसवाडी : प्राचीन किल्ल्याचे अवशेष (करमळी), गोरखनाथ मठाचे अवशेष (करमळी), सेंट मायकल चर्च (ताळगाव), होलीक्रॉस चर्च (सांताक्रूझ), इमॅक्युलेट कन्स्पेशन चर्च (पणजी).
फोंडा : हीरो स्टोन (कुंकळ्ये), मर्दनगड किल्ला (फोंडा), सती स्टोन (खांडेपार), सिद्धनाथ पर्वत शिल्प (बोरी).
धारबांदोडा : झळम्याचो गुणो (तांबडी सुर्ला), प्राचीन देवळाचे अवशेष (उसगाव)
सासष्टी : साळ नदीचा उगम (वेर्णा), होली स्पिरिट चर्च (मडगाव), होली क्रॉस चर्च (वेर्णा).
केपे : महादेव मंदिरानजीकचे दगडी शिल्प (काकोडा), पोर्तुगीज काळातील दगडी शिल्प (बाळ्ळी), पांडव तळे (काकोडा).
सांगे : प्राचीन मंदिराचे अवशेष (उगे), संगमेश्वर प्रार्थना स्थळ (सांगे)
काणकोण : सती स्टोन (खोतीगाव), परशुराम मंदिर (पैंगीण)
मुरगाव : सेंट अॅन्ड्रू चर्च
१२२ घरे वारसास्थळ
याशिवाय १२२ घरे वारसास्थळ म्हणून अधिसूचित झाले आहेत. यामध्ये जीवबादादा केरकर हाऊस (पेडणे), देशप्रभू राजवाडा (पेडणे), आबे फारिया हाऊस (कांदोळी), राणे वाडा (साखळी), कालिदास दुभाशी यांचे घर (साखळी), शंकर घाडी यांचे घर (वेळगे), प्रशांत धोंड (वेळगे), उजगावकर घर (उसगाव), सौंदेकर राजवाडा (नागेशी), म्हामय कामत यांचे घर (पणजी), वागळो हाऊस (पणजी), शेखर प्रभू (श्रीस्थळ) यांच्या घरांचा समावेश आहे.
पारंपरिक लोककलेत ४६ प्रकारचे संगीत
पारंपरिक लोककलेत ४६ प्रकारच्या संगीताचा समावेश आहे. त्यामध्ये सुवारी, मंदिरातील संगीत, चर्चमधील संगीत, गाव काणी, ओवया, भजन, कीर्तन, ललीत, रोमाट, शिमगो, फुगडी, कांतार, धालो यांचा समावेश आहे.
६१ पारंपरिक व्यवसायांचा समावेश
मजूर, फूल विक्रेते, मच्छीमार, गवळी, शेतकरी, सोनार, लोहार, सुतार, गवंडी, चितारी, खाजे विक्रेते, रयत, पाडेली, चणे विक्रेते, फोगेरी, नाभिक अशा ६१ व्यवसायांचा पारंपरिक व्यवसायांमध्ये समावेश झाला आहे.