एनसीईआरटीचे सर्व्हेक्षण : १८ टक्के विद्यार्थ्यांना एकाकी वाटते
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) केलेल्या सर्व्हेक्षणानुसार गोव्यातील २२ टक्के विद्यार्थांना शाळेत देण्यात येणाऱ्या विविध कामांचा तणाव आहे किंवा याबाबत त्यांना भीती वाटत आहे. एनसीईआरटीने मागील वर्षी ‘परख’ राष्ट्रीय सर्व्हेक्षण केले होते. याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. यामध्ये गोव्यातील २६९ शाळांतील ६,४६४ विद्यार्थी, तसेच ८६५ शिक्षकांचे सर्व्हेक्षण केले होते. हे विद्यार्थी इयत्ता तिसरी, सहावी आणि नववीमधील होते.
अहवालानुसार, १७ टक्के विद्यार्थांना शाळेत जावे असे वाटत नाही. २० टक्के विद्यार्थी नाखूष आहेत किंवा ते उदास आहेत. विद्यार्थी तणावात असतात, तेव्हा त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी कोणी व्यक्ती असणे आवश्यक असते. राज्यातील २२ टक्के विद्यार्थ्यांना ते तणावात असतात अथवा उदास असतात, तेव्हा त्यांना बोलण्यासाठी व्यक्ती मिळणे अवघड जाते. याशिवाय २२ टक्के विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर खूप जास्त उपक्रम अथवा कामे करावी लागत असल्याचे वाटते. १७ टक्के विद्यार्थ्यांना काळजी वाटते किंवा ते घाबरलेले असतात.
राज्यातील १८ टक्के विद्यार्थ्यांना आपण एकाकी असल्याचे वाटते. १२ टक्के विद्यार्थी भविष्यातील लक्ष्य पूर्ण करू शकण्याच्या क्षमतेबाबत सकारात्मक नाहीत. १० टक्के विद्यार्थ्यांना ते असलेल्या सध्याच्या स्थितीत सुरक्षित वाटत नाही. सर्व्हेक्षणात शिक्षकांनाही प्रश्न विचारण्यात आले. अहवालानुसार राज्यातील १३ टक्के शिक्षक त्यांच्या वर्गात विद्यार्थ्यांमध्ये झालेली कोणत्याही प्रकारची भांडणे मिटवण्यात सक्षम नसल्याचे स्पष्ट झाले. १ टक्के शिक्षक त्यांच्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याची भावना समजू शकत नाहीत.
शिक्षकांसाठी मानसिक आरोग्य कार्यक्रम तयार करा !
अहवालात म्हटले आहे की, विद्यार्थ्यांवर भावनिक आणि मानसिक आव्हानांचा परिणाम होत असतो. काही शिक्षकांनाही विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेणे कठीण होते. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शाळांनी शिक्षकांसाठी व्यापक मानसिक आरोग्य कार्यक्रम तयार करणे आवश्यक आहे. शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या भावनिक स्थितीची ओळख पटविण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी, वर्गात प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी योग्य साधने पुरवण्याची शिफारस अहवालात करण्यात आली आहे.