राज्यात ५२ दिवसांत ७५ इंच पावसाची नोंद

आतापर्यंत धारबांदोडा केंद्रात सर्वाधिक पाऊस


5 hours ago
राज्यात ५२ दिवसांत ७५ इंच पावसाची नोंद

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यातील मान्सून सध्या कमजोर झाला आहे. असे असले तरी अधूनमधून मुसळधार पावसाची नोंद होत आहे. राज्यात १ जून ते ११ जुलै दरम्यान सरासरी ५०.०४ इंच पावसाची नोंद झाली. वरील कालावधीत १४ पैकी ६ केंद्रांत पावसाने ५० इंचांची सरासरी पूर्ण केली. आतापर्यंत धारबांदोडा केंद्रात सर्वाधिक ७५.९० इंच पावसाची नोंद झाली. राज्यात २० मे ते ११ जुलै दरम्यान सरासरी ७५.१४ इंच पावसाची नोंद झाली.
राज्यात शुक्रवारी ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. हवामान खात्याने १३ ते १५ जुलै दरम्यान मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यानुसार या तीन दिवसांसाठी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. १२, १६ व १७ जुलै दरम्यान तुरळक पावसाची शक्यता असल्याने कोणताही अलर्ट दिलेला नाही. २४ तासांत पणजीत कमाल ३१.७ इंच, तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस नोंद झाले.
पुढील पाच दिवस कमाल तापमान ३१ अंश, तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. गुरुवारी मुरगावमधील कमाल तापमान ३०.२ अंश, तर किमान तापमान २५.६ अंश सेल्सिअस राहिले. राज्यात २४ तासांत सरासरी ०.७७ इंच पाऊस झाला. यादरम्यान केपेत १.४९ इंच, धारबांदोड्यात १.२७ इंच, तर साखळीत १.१६ इंच पावसाची नोंद झाली.