१,२४८ अपघात : दररोज सरासरी ६ अपघात, ३२ तासांत एकाचा मृत्यू
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात गुरुवारी बेतोडा येथे भीषण अपघातात युवक आणि युवतीचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर राज्यातील अपघाती मृत्यूंचा आढावा घेतला असता, १ जानेवारी ते १० जुलै या १९१ दिवसांच्या कालावधीत १,२४८ अपघात झाले. त्यात १४३ जणांचा मृत्यू झाला. वरील कालावधीत २०२४ च्या तुलनेत १७८ (१२.४८ टक्के) अपघात आणि अपघाती मृत्यू २५ (१४.८८ टक्के) कमी झाले. दररोज सरासरी ६ अपघात, तर ३२ तासांत एकाचा अपघातीमृत्यू होत आहे.
राज्यात वरील कालावधीत एकूण १,२४८ अपघात झाले. यापैकी १३८ भीषण अपघातांची नोंद आहे. एकूण १४३ जणांचा अपघातांत मृत्यू झाला. याशिवाय ११९ अपघातांत १४२ जण गंभीर जखमी झाले. २६७ अपघातांत ४०१ जण किरकोळ जखमी झाले. याशिवाय ७२४ अपघातांत वाहनांचे मोठे नुकसान झाले. २०२४ मध्ये वरील कालावधीत राज्यात १,४२६ अपघात झाले. त्यातील १६१ भीषण अपघातांत १६८ जणांचा बळी गेला. १०१ अपघातांत १४९ जणांना गंभीर, तर २७१ अपघातांत ४३९ जणांना किरकोळ दुखापती झाल्या. ८९३ वाहनांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे २०२५ मध्ये २०२४ च्या तुलनेत १७८ अपघात, तर अपघाती मृत्यूही २५ ने कमी झाले आहेत.
अपघात रोखण्यासाठी पोलिसांकडून जागृती
अपघाती मृत्यू रोखण्यासाठी गोवा पोलीस विविध उपक्रम हाती घेत आहेत. त्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अपघात आणि अपघाती मृत्यू होत आहेत. त्यामुळे वाहतूक नियमांबाबत जागृती केली जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. त्यात प्रामुख्याने मद्यपी चालक, अतिवेगाने वाहन हाकणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे, सीट बेल्ट न वापरणे, वाहनांना काळ्या काचा लावणे अशा प्रकारांचा समावेश आहे. असे असतानाही राज्यात वाहन अपघात आणि मृत्यू होत आहेत. खराब रस्ते व रस्त्याचे चुकीच्या पद्धतीने बांधकाम, वाहनचालकांची बेफिकिरी, वाहतूक नियमांचे उल्लंघन अशी अनेक कारणे अपघाताला कारणीभूत ठरत आहेत.