गतवर्षी हेल्मेट, सीटबेल्टचा वापर न केल्यामुळे १३० जणांनी गमावला जीव

अपघात विश्लेषण अहवालातून स्पष्ट : वर्षभरात २,६८२ अपघातात २८६ मृत्यू


2 hours ago
गतवर्षी हेल्मेट, सीटबेल्टचा वापर न केल्यामुळे १३० जणांनी गमावला जीव

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ च्या कालावधीत २,६८२ रस्ता अपघातांत २८६ जणांचा मृत्यू झाला होता. यात १३० जणांचा मृत्यू सुरक्षा साधनांचा (हेल्मेट, सीट बेल्ट) वापर न केल्यामुळे झाला होता. ही टक्केवारी ४५.४५ एवढी आहे. वरील १३० पैकी ११५ लोकांचा हेल्मेटचा वापर न केल्यामुळे मृत्यू झाला होता. याशिवाय १४८ जण गंभीर, तर ३७० किरकोळ जखमी झाल्याची माहिती वाहतूक पोलीस विभागाच्या वार्षिक अपघात विश्लेषण अहवाल २०२४ मधून समोर आली आहे.
अहवालानुसार, राज्यात २०२४ मध्ये हेल्मेट परिधान न केल्यामुळे ११५ जणांचा मृत्यू झाला होता. त्यातील ७३ चालकांनी, तर ४२ दुचाकीवर मागे बसलेल्यांनी हेल्मेट परिधान केले नव्हते. याशिवाय हेल्मेट न घातल्यामुळे ६० दुचाकी चालकांना, तर ६९ दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तींना अपघातात गंभीर दुखापत झाली. १२६ दुचाकी चालक आणि १९२ दुचाकीवर मागे बसलेले किरकोळ जखमी झाले आहेत, अशी माहिती अहवालात दिली आहे.
राज्यात वरील कालावधीत ५ चारचाकी चालकांचा आणि १० प्रवाशांचा चारचाकी वाहनात सीट बेल्टचा वापर न केल्यामुळे मृत्यू झाला. याव्यतिरिक्त ५ चारचाकी चालक गंभीर, तर ११ किरकोळ जखमी झाले. चारचाकी वाहनातील १४ गंभीर, तर ४१ प्रवासी किरकोळ जखमी झाले होते.
अनेकांना नडला निष्काळजीपणा
मोटार वाहन कायदा १९८९ नुसार दुचाकी चालकाने आयएसआय प्रमाणपत्र असलेले हेल्मेट वापरावे, हेल्मेटचा पट्टा व्यवस्थित बांधावा, अशी सूचना असतानाही दुचाकी चालक हेल्मेट परिधान करत नाहीत. काही चालक हेल्मेट हाताला अडकवतात. काही जण दुचाकीला लावतात, तर काही जण मागे बसलेल्या व्यक्तीकडे हेल्मेट देतात. रस्त्यावर पोलीस दिसताच चालकाकडून हेल्मेट परिधान केले जाते. अशा बेफिकीर वृत्तीमुळेच अनेकांना प्राणाला मुकावे लागते. चारचाकी वाहनात सीट बेल्ट घालून वाहन चालविणे, तसेच प्रवास करणे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. असे असताना अनेकजण या नियमाचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येते.