चर्चेची वार्तामधून नागरिकांचे मत : भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणेही गरजेचे
पणजी : रॉटविलर, पिटबूल या सारख्या हिंस्र कुत्र्यांवर बंदी घालण्यासाठी सरकार पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडणार आहे. या हिंस्र कुत्र्यांनी राज्यात या आधी अनेक बळी घेतले आहेत. त्यामुळे याबाबत ‘गोवन वार्ता’ने ‘चर्चेची वार्ता’मधून नागरिकांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
कुत्र्यावर नको, पाळणाऱ्यावर बंदी घाला.
राजाराम पाटील
५ वर्षांनंतर मंत्र्यांना सुद्धा पुन्हा निवडणूक लढायला बंदी घाला. मग सगळे सुरळीत चालेल.
परेरा जॉकीम
गोव्यात आक्रमक प्रजातींच्या कुत्र्यांवर बंदी घालणे आवश्यक आहे. जेणेकरून नागरिकांचे विशेषतः लहान मुलांचे संरक्षण होईल. भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणेही तितकेच गरजेचे आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांना रस्त्यात अनेकदा भटक्या कुत्र्यांचा त्रास होतो. वाढत्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी कठोर नियम लागू करून तातडीने कारवाई करावी.
हरी नाईक
गोव्यात यापुढे बाहेरील लोकांना जमिनी विकू नयेत, यासाठी ठराव घेण्याची थोडी उत्सुकता दाखवा. गोव्यातील लोक या कुत्र्यांविरोधातील ठरावापेक्षा या ठरावामुळे जास्त आनंदी होतील.
विनोद नाईक
रॅटविलर आणी पिटबूल या हिंसक कुत्र्यांवर बंदी घालण्यासाठी गोवा विधानसभा अधिवेशनात विधेयक येणार आहे, ही तर एक चांगलीच गोष्ट आहे म्हणा. पण याच्या मागे बरीच कारणे आहेत. एक मुख्य कारण म्हणजेच लाईट बिल देण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीला घाबरण्याची गरज नाही आणि या दोन प्रजातीच्या कुत्र्यांमुळे बऱ्याचजणांनी आपला जिव गमावला आहे. त्यांना न्याय देण्यासारखी गोष्ट आहे, असे म्हाणावे लागेल. पण बंदी आल्यावर त्याच्या अंमलबजावणीत कुठलाच हलगर्जीपणा करू नये. एखादा व्यक्ती नियम पाळत नसेल तर त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे.
अमित बेळेकर
धोकादायक असलेल्या प्रत्येक कुत्र्यांवर बंदी घातली पाहिजे. रस्त्यावरील जे कुत्रे शाळेत जाणाऱ्या मुलांच्यामागे धावतात त्यावरही बंदी घालावी.
दामोदर रेडकर
हल्लीच्या काळात प्रसारमाध्यमात अशा प्रकारच्या कुत्र्यांनी अनेकांवर केलेले हल्ले आणि भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांचे बळी घेतल्याचा बातम्या वाचनात येत आहेत. त्यावर आळा आणण्यासाठी हे बंदी विधेयक त्वरित अंमलात आणावे. तसेच गावागावात पाळीव आणि भटक्या कुत्र्यांचा खूपच उपद्रव होत असतो. दिवसा शालेय मुलांवर हल्ले, वाटसरुंना चावा घेणे, तर रात्रीच्या वेळी दुचाकी वाहचालकांवर आक्रमण करतात. त्यामुळे अनेक अपघात होतात. सरकारने त्यांचाही बंदोबस्त करावा. तसेच सरकारने हल्लीच पाळीव कुत्र्यांची नोंदणी करणे, प्रत्येक श्वान शौकीनांना सक्तीचे असेल, असा जो फतवा काढला होता, त्याचे काय झाले याची चौकशी आणि अंमलबजावणीसाठी समाज माध्यमानी प्रकाशझोत टाकावा.
द्वारकानाथ गवंडी
काही लोक या कुत्र्यांना दिवसा बांधून घालून रात्रीच्यावेळी आपल्या घराच्या गेटच्या आत सोडून देतात त्यामुळे चोरांपासून सुरक्षा हाेते. या प्रजातीच्या कुत्र्यांवर बंदी घालण्यापेक्षा सरकारने पंचायत किंवा नगरपालिकेकडून परवानगी घेणे अनिवार्य करून कायदा कडक केला पाहिजे. कारण स्वत:च्या सुरक्षेसाठी बंदुका वगैरे बाळगण्याचे परवाने सरकारकडून देण्यात येतातच.
राजेश देसाई
प्राण्यांच्या हितासाठी कोणत्याही कुत्र्यांची पैदास आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात यावी.रस्त्यावरील कुत्र्यांची नसबंदी प्राधान्याने करावी.
राम गावस
मानवनिर्मित हिंसाचाराचे काय? राजकारणी आणि नेत्यांवर खून, भ्रष्टाचाराचे हजारो गुन्हे आहेत. लोक अशा लोकांवर बंदी का मागत नाहीत? जर कुत्र्यांना प्रशिक्षण दिले आणि त्यांची काळजी घेतली, तर ते त्यांना चिथावणी देईपर्यंत कोणालाही इजा करत नाहीत. सर्व कुत्र्यांच्या मालकांना कुत्र्यांचे प्रशिक्षण अनिवार्य करा.
मालिनी नाईक