महिलेसह मूल्यांकन करणाऱ्या सोनाराविरोधात गुन्हा
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पणजी येथील सीएसबी बँकेच्या पणजी शाखेत बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून तब्बल ७.३५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पणजी पोलिसांनी संशयित जन्नत हनाबरकादादी (केवणे - करंझाळे) या महिलेसह सोन्याचे मूल्यांकन करणारे सोनार प्रणेश कारेकर (फातोर्डा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी सीएसबी बँकेच्या पणजी शाखेचे व्यवस्थापक अनुदीप रायकर यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, संशयित जन्नत हनाबरकादादी हिने १६ एप्रिल २०२५ रोजीपूर्वी १२८ ग्रॅमच्या १६ बांगड्या बँकेत तारण ठेवून ७.३५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यावेळी बँकेचे मूल्यांकन करणारे सोनार प्रणेश कारेकर (फातोर्डा) यांनी वरील दागिने अस्सल असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. याच दरम्यान सदर दागिन्यावर संशय आल्यामुळे पुन्हा चाचणी केली असता, कर्जासाठी तारण ठेवलेले दागिने बनावट असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे बँकेची ७.३५ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार पणजी पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन नाईक यांनी वरील संशयितांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१६(४) आरडब्ल्यू ३(५) गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.