गोवा मराठी चित्रपट महोत्सव ९,१० ऑगस्ट रोजी

अभिनेता अक्षय कुमार यांच्या हस्ते होणार उद्घाटन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
4 hours ago
गोवा मराठी चित्रपट महोत्सव ९,१० ऑगस्ट रोजी

पणजी : चौदावा गोवा मराठी चित्रपट महोत्सव ९ आणि १० ऑगस्ट रोजी पणजी येथील आयनॉक्स चित्रगृह आणि मॅक्विनेझ पॅलेस येथे होणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते अक्षय कुमार यांच्या हस्ते होणार आहे. महोत्सवात पंधरा हून अधिक मराठी चित्रपटांचे सादरीकरण होणार आहे. महोत्सवाचे संचालक संजय शेट्ये यांनी ही माहिती दिली. शुक्रवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उदय म्हांब्रे , सचिन चाटे, विनोद शेट्ये उपस्थित होते.
संजय शेट्ये यांनी सांगितले की, महोत्सवात दोन मराठी चित्रपटांचा वर्ल्ड प्रीमियम होणार आहे. याशिवाय काही चित्रपट गोव्यात प्रथमच दाखवले जाणार आहेत. उद्घाटन समारंभ ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता आयनॉक्स येथे होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित असणार आहेत. यंदा ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना त्यांच्या पाच दशकांहून अधिक काळाच्या सांस्कृतिक योगदानाबद्दल ‘कृतज्ञता सन्मान’ प्रदान करण्यात येणार आहे. गोवा मराठी चित्रपट महोत्सव हा देशातील सर्वात मोठा आणि दीर्घकाळ चालणारा मराठी चित्रपट महोत्सव आहे.
महोत्सवात यंदा अनेक नामवंत कलाकारांचा सहभागी होणार आहेत. प्रसाद ओक, सोनाली कुलकर्णी, गजेंद्र अहिरे, मृणाल कुलकर्णी, छाया कदम, किशोर कदम, मिलिंद शिंदे, जितेंद्र जोशी, रोहिणी हटंगडी, आदिनाथ कोठारे, सुबोध भावे, सई ताम्हणकर, ओम भुतकर, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान, निकिता दत्ता, अमृता सुभाष यांच्यासह अनेक कलाकार प्रेक्षकांशी संवाद साधण्यासाठी महोत्सवात सहभागी होणार आहेत. त्यांच्या चित्रपटांचे दिग्दर्शक देखील उपस्थित राहणार आहेत.
महोत्सवात काही आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेले आणि पुरस्कारप्राप्त चित्रपट सादर होणार आहेत.यामध्ये जयंत सोमलकर दिग्दर्शित ‘स्थळ’, छत्रपाल निनावे यांचा ‘घाट’, नवज्योत बांदिवडेकर दिग्दर्शित ‘घरात गणपती’ या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच ‘आता थांबायचं नाही’, ‘पाणी’, ‘कुर्ला ते वेंगुर्ला’, ‘धर्मस्य’, ‘स्नोफुलवा’ आणि ‘सिनेमान’, ‘गुलकंद’, ‘एप्रिल मे ९९’ हे समीक्षकांनी गौरवलेल्या चित्रपट दाखवले जातील. महोत्सवासाठी ऑनलाइन नोंदणी लवकरच ‘बुर्रा’ नावाच्या अॅप व वेबसाईटवर सुरू होईल. तर प्रत्यक्ष नोंदणीसाठी २० जुलैपासून सुरू होणार आहे.
८ रोजी ‘एआय’वर कार्यशाळा
यंदा एआयच्या वापरावर ८ ऑगस्ट रोजी कार्यशाळा देखील घेण्यात येईल. यंदाच्या महोत्सवात गोमंतकीय निर्मात्यांनी निर्माण केलेले दोन लघुपट दाखवण्यात येतील. शर्व शेट्ये यांनी निर्माण केलेला 'कर्ज' हा हिंदी लघुपट तसेच किशोर अर्जुन निर्मित 'एक कप च्या' हा कोंकणी लघुपट प्रदर्शित केला जाणार असल्याचे शेट्ये यांनी सांगितले.