इतरांचा पोलिसांना गुंगारा : पेडणे पोलिसांसह सिंधुदुर्गातील पोलिसांकडून कसून तपास सुरू
पेडणे : मालपे येथे टॅक्सीचालकावर हल्ला करून सावंतवाडी येथे चोरी केल्याप्रकरणी जुने गोवा पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले, अशी माहिती पेडणेचे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांनी दिली. दरम्यान, इतरांचा शोध घेण्यासाठी पेडणे पोलिसांसह सिंधुदुर्गातील पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.
या प्रकरणातील एका संशयित अल्पवयीन युवकाला पेडणे पोलिसांनी यापूर्वी अटक केली होती. त्याला शुक्रवारी बाल न्यायालयात हजर करून मेरशी येथील सुधारगृहात पाठविण्यात आले.
कळंगुट येथून भाड्याने टॅक्सी करून हे संशयित महाराष्ट्राच्या दिशेने निघाले होते. बुधवारी रात्री त्यांनी मालपे येथे टॅक्सीचालक संजीवन वेंगुर्लेकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांना जखमी केले. टॅक्सीचालकाने प्रतिकार केल्यानंतर हे संशयित सावंतवाडीच्या दिशेने पळाले. वेंगुर्लेकर यांच्यावर जीएमसी-बांबोळी येथे उपचार सुरू आहेत.
दरम्यान, बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटेपर्यंत या संशयितांनी सावंतवाडी शहरात धुमाकूळ घातला होता. सावंतवाडी शिल्पग्राम परिसरातून त्यांनी दोन मोटरसायकल आणि हेल्थ पार्क येथे झोपलेल्या कामगारांचे मोबाईल लंपास केले. तसेच तेथील कारागृहामागे असलेल्या श्रमविहार कॉलनीतील एका बंगल्यातही त्यांनी चोरी केली.
टॅक्सीचालकावरील हल्ल्याच्या घटनेनंतर गोवा पोलीस या चोरांच्या शोधात सावंतवाडीत दाखल झाले. गोवा पोलीस सावंतवाडीत येण्यापूर्वीच संशयितांनी पलायन केले होते. सावंतवाडीत चोरीला गेलेली एक मोटरसायकल सकाळी शिवडाव-कणकवली येथे सापडल्याने चोर कणकवलीच्या दिशेने गेल्याचा पोलिसांचा अंदाज होता. सावंतवाडी पोलिसांनी शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे तपास सुरू केला असून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागही या प्रकरणाचा तपास करत आहे. सिंधुदुर्ग पोलिसांनी तपास करण्यासाठी गोवा तसेच अन्य ठिकाणी पथके पाठवली होती. अखेर जुने गोवा येथे दोन संशयितांना ताब्यात घेण्यात यश आले.
आंतरराज्य टोळीचा सहभाग
या प्रकरणात आंतरराज्य टोळीचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. ही मोठी टोळी असून तिचे धागेदोरे पुणे आणि पंढरपूरपर्यंत जोडले असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या तपासातून अनेक चोरी प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता आहे. गोवा पोलीस शनिवारी या प्रकरणाची सविस्तर माहिती देणार आहेत.