दोन दुचाकींच्या धडकेत विद्यार्थिनीसह दोघांचा मृत्यू

युवकाची प्रकृती चिंताजनक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10th July, 04:47 pm
दोन दुचाकींच्या धडकेत विद्यार्थिनीसह दोघांचा मृत्यू

फोंडा : बेतोडा बगल रस्त्यावर दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका विद्यार्थिनीसह दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. यामधील एका युवकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. एका दुचाकीच्या मागे बसलेली विद्यार्थिनी ईशा गावस (केरी- सत्तरी) ही जागीच ठार झाली असून दुसऱ्या दुचाकीवरील आदित्य देसाई (बेतोडा) यांचाही जागीच मृत्यू झाला. 

एका दिशेने आदित्य देसाई चालले होते. त्यावेळी समोरून अदिती उमेश मांद्रेकर  (तुळशीमळा, पर्ये, सत्तरी) व इशा गावस (केरी- सत्तरी) येत होत्या. भरधाव वेगात येणाऱ्या आदित्य देसाई (बेतोडा) यांच्या स्कूटरला अदितीच्या स्कूटरची धडक बसली. अपघातात इशा गावस यांचा जागीच मृत्यू झाला. समोरून येणाऱ्या आदित्य देसाई यांचाही जागीच मृत्यू झाला. आदित्यच्या मागे बसलेला योगेश पाटील (महाल, कुर्टी) हा युवक गंभीर जखमी झाला. चौघाही जखमींना फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दोघांना मृत घोषित करण्यात आले . 

उर्वरित दोघांना अधिक उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले. त्यापैकी योगेश पाटीलची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

शिरोडा येथील कामाक्षी होमिओपॅथीच्या त्या दोघी विद्यार्थिनी होत्या. कालच त्यांचा निरोप समारंभ झाला होता. मात्र काही कामानिमित्त आज त्या कॉलेजला आल्या होत्या. कॉलेजमधून परतताना हा अपघात झाला.

हेही वाचा