झोपेच्या गोळ्या अतिप्रमाणात विदेशात पाठविणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल

एएनसीची कारवाई : वैध प्रिस्क्रिप्शनशिवाय गोळ्या पाठविण्याचा प्रयत्न

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
09th July, 11:53 pm
झोपेच्या गोळ्या अतिप्रमाणात विदेशात पाठविणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल

पणजी : वैध प्रिस्क्रिप्शनशिवाय झोपेच्या गोळ्या अतिप्रमाणात विदेशात पाठविण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने (एएनसी) नावेली-सासष्टी येथील एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मडगाव येथील रेल्वे मेल सेवेद्वारे एक औषधाचे पार्सल क्लिफ्टन यूएसएला पाठविण्यात आले होते. हे पार्सल मुंबईत पोचल्यानंतर तेथील रेल्वे आणि इतर सरकारी अधिकाऱ्यांना वैध प्रिस्क्रिप्शन संदर्भात संशय आला. त्यामुळे संबंधित पार्सल पुन्हा गोव्यात पाठविण्यात आले. त्यानंतर मडगाव येथील रेल्वे मेल सेवा अधिकाऱ्यांनी एएनसीला संपर्क साधून वरील माहिती दिली. एएनसीचे उपनिरीक्षक गिरीश पाडलोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ८ जुलै रोजी दुपारी १२.३० ते ३. ३० दरम्यान संबंधित पार्सल उघडून तपासणी केली. त्यावेळी त्यात ५३४ रुपयांच्या २१० गोळ्या लोराझेपामच्या (झोपेच्या गोळ्या) आणि ५०० सेफ्टम टॅब्लेट सापडल्या. त्यानंतर पथकाने सदर पार्सल पाठविणाऱ्या नावेली येथील महिलेची चौकशी केली. तिने पार्सल क्लिफ्टन यूएसए येथे असलेल्या तिच्या बहिणीला पाठविण्यात आल्याची माहिती दिली. या प्रकरणी तिची अधिक चौकशी केली असता, तिच्याकडे वैध प्रिस्क्रिप्शन मिळाले नाही. त्यानुसार, एएनसीने तिच्या विरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याचे कलम ६६ अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी एएनसीचे महिला निरीक्षक मीरा डिसिल्वा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गिरीश पाडलोस्कर पुढील तपास करीत आहेत.            

हेही वाचा