सुरक्षा रक्षकाला कारखाली चिरडून ठार मारण्याचा वागातोर येथे प्रयत्न

लोणावळा-पुणे येथील पर्यटकाला अटक : सुरक्षा रक्षक गंभीर जखमी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
8 hours ago
सुरक्षा रक्षकाला कारखाली चिरडून ठार मारण्याचा वागातोर येथे प्रयत्न

म्हापसा : वागातोर येथे गेट वारंवार बंद करत असल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून व्हिला अपार्टमेंटच्या सुरक्षा रक्षकावर कार घालून त्याला चिरडण्यात आले. या प्राणघातक हल्ल्यात उत्तम दास (३०, मूळ आसाम) हा सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाला आहे. हणजूण पोलिसांनी संशयित आरोपी सुजन चंद्रवदन मेहता (रा. लोणावळा-पुणे) याला अटक केली आहे.

ही घटना मंगळवार, ८ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास धी कार्टयार्ड व्हिला येथे घडली. या प्रकरणी सुरक्षारक्षकाची पत्नी रुपाली दास हिने पोलिसांत तक्रार दिली आहे. सोझा ट्रेडिंग कंपनी प्रा. लि.च्या धी कोर्टयार्ड या व्हिला अपार्टमेंटमध्ये गेल्या चार वर्षांपासून उत्तम दास हा सुरक्षारक्षक म्हणून तर त्याची पत्नी कामगार म्हणून कामाला आहेत.

पर्यटक दोन दिवसांपूर्वीच या व्हिलामध्ये उतरला होता. ग्राहक, पर्यटक व्हिलामधून ये-जा करीत असताना सुरक्षारक्षक व्हिलाचे लोखंडी फाटक बंद करीत होता. या फाटकाजवळच सुरक्षारक्षकाची खोली आहे.

लोखंडी गेट उघडायला गेलेल्या सुरक्षकाच्या नकळत संशयिताने एमएच ०१ ईआर १८९७ क्रमांकाची कार रिव्हर्स घेत त्याच्या अंगावर घातली व त्याला चिरडले. हा प्रकार पाहून फिर्यादी तसेच जवळच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयिताला मारहाण केली. मात्र, तरीही त्याने गाडी पुढे घेतली नाही. शेवटी जमावाने जखमीला कसेबसे बाहेर काढले व रूग्णवाहिकेतून म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल केले. तिथून त्याला गोमेकॉमध्ये हलवण्यात आले.

या प्राणघातक हल्ल्यात उत्तम दास याचा हात आणि पाय मोडला गेला आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले व त्याला अटक केली. पुढील तपास हणजूण पोलीस करीत आहेत.

पर्यटकाचा सुरक्षारक्षकाशी वाद

आपल्याला कधीही ये- जा करावे लागते. फाटक बंद असल्याने वारंवार उघडायला तुला बोलवावे लागते, त्यामुळे ते उघडेच ठेव, असा दम देत संशयिताने सुरक्षा रक्षकाशी वाद घातला. तसेच जखमी आणि त्याच्या पत्नीला गंभीर परिणामाची धमकी दिली. 

हेही वाचा