हणजूण पोलिसांमुळे वृद्ध दाम्पत्याला परत मिळाले सहा लाख रुपये

गिफ्ट व्हाऊचर, हॉलिडे पॅकेजच्या नावाखाली झाली होती लुबाडणूक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17 hours ago
हणजूण पोलिसांमुळे वृद्ध दाम्पत्याला परत मिळाले सहा लाख रुपये

म्हापसा : कळंगुट येथील एका वृद्ध जोडप्याला गिफ्ट व्हाऊचर आणि हॉलिडे पॅकेजच्या नावाखाली गंडवण्याचा दिल्लीतील एका हॉलिडे टूर कंपनीचा प्रयत्न फोल ठरला आहे. हणजूण पोलिसांनी त्वरित कारवाई करत बँक खाते फ्रीझ केल्यामुळे, या दाम्पत्याला त्यांची फसवणूक करून घेतलेली ६ लाख रुपये रक्कम परत मिळाली.
हा प्रकार गेल्या एप्रिल ते जून २०२५ दरम्यान घडला. जोडप्याने ऑक्टोबर २०२४ मध्ये कार खरेदी केली होती. त्यानंतर एप्रिल २०२५ मध्ये त्यांना 'लकी कस्टमर' म्हणून गिफ्ट व्हाऊचर मिळाल्याचा फोन आला आणि ते घेण्यासाठी हणजूणमधील एका हॉटेलमध्ये बोलावण्यात आले. तिथे गेल्यावर त्यांना गिफ्ट व्हाऊचर न देता, हॉलिडे पॅकेजेसची माहिती देण्यात आली. २६ हजार सदस्यत्व फी आणि मासिक २५ हजार रुपये फी भरण्यास सांगण्यात आले. कुटुंबीय परदेशात असल्याने हे पॅकेज फायदेशीर ठरेल असे समजून त्यांनी २५ हजार रुपये रोख रक्कम दिली. संशयितांनी त्यांचे क्रेडिट कार्ड पाहून परत केले, मात्र गिफ्ट व्हाऊचर दिले नाही.
मे महिन्यात हे दाम्पत्य दुबईला मुलांकडे गेले. त्यांना तिकिटांसाठी संशयितांकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी स्वतः तिकीट काढून प्रवास केला. दुबईत पोहोचल्यावर त्यांच्या बँक खात्यातून ५.७५ लाख रुपये काढल्याचे त्यांना आढळले. त्यांनी तत्काळ बँकेकडे ऑनलाईन आणि नंतर लेखी तक्रार केली, परंतु पैसे परत मिळाले नाहीत. अखेर त्यांनी हणजूण पोलिसांत धाव घेतली.
हणजूण पोलिसांच्या तत्परतेमुळे पैसे परत
हणजूण पोलिसांनी लगेच कारवाई करीत पैसे हस्तांतरित झालेले ते बँक खाते फ्रीझ केले. बँक खाते फ्रीझ झाल्याचे समजल्यावर सदर कंपनीकडून पोलिसांना फोन आला व पैसे परत देण्याची हमी दिली. त्यानुसार शनिवारी (दि. ५) सदर कंपनीचा एक प्रतिनिधी हणजूण पोलिसांत दाखल झाला व फिर्यादी दाम्पत्यांचे ६ लाख रुपये त्यांनी पोलिसांसमक्ष परत केले. पैसे मिळवून दिल्याबद्दल या वृद्ध दाम्पत्याने हणजूण पोलिसांचे आभार मानले.          

हेही वाचा