गलिच्छ जागी बनविण्यात येणारे जेवणाचे ४०० डबे नष्ट

पर्रा येथे डबे पुरवठा करणाऱ्या आस्थापनावर एफडीएचा छापा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17 hours ago
गलिच्छ जागी बनविण्यात येणारे जेवणाचे ४०० डबे नष्ट

ब्रिटोवाडा, पर्रा येथे गलिच्छ जागी सुरू असलेले डबे पुरवठा आस्थापन.

म्हापसा : ब्रिटोवाडा, पर्रा येथील एका जेवणाचे डबे पुरवठा आस्थापनावर अन्न व औषधे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून गलिच्छ जागी तयार करून भरलेले ४०० जेवण नष्ट केले. तसेच सदर घराला सील ठोकले.

ही कारवाई सोमवारी ७ रोजी दुपारी करण्यात आली. पर्रा येथील एका गलिच्छ जागी जेवणाचे डबे पुरवठा आस्थापन सुरू असल्याची माहिती एफडीएला मिळाली होती. त्यानुसार सदर आस्थापनावर अधिकाऱ्यांनी छापा टाकला.

जुन्या भाड्याच्या घरात असुरक्षित अशा ठिकाणी हे जेवण बनवले जात होते. हे डबे पुरवठा जेवण बिहार मधील लोक बनवित होते. चौकशीवेळी हे टीफिन्स डबे हॉटेल व व्हिलामध्ये सेवा बजावणारे सुरक्षारक्षक आणि इतर नोकरदार लोकांना पुरवले जात असल्याचे आढळून आले.

सदर किचन सुरू करण्यास अन्न व औषधे प्रशासनाचा परवाना घेण्यात आलेला नाही. जेवण बनविणारे स्वयंपाकघर आणि भांडी धुवायला असलेली जागा ही गलिच्छ अशी होती. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पंच सदस्यांना बोलावून या बेकायदा जेवणाचे डबे पुरवठा आस्थापनाची माहिती दिली. नंतर सुमारे ४०० डब्यांतील जेवणाची अधिकाऱ्यांनी विल्हेवाट लावली व सदर घर सीलबंद केले. दरम्यान, या घटनेमुळे अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

एफडीएचे अधिकारी रिचर्ड नोरोन्हा, राजाराम पाटील, अमित मांद्रेकर, लेनिन डिसा आणि नौशीन मुल्ला यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. या घटनेमुळे परवाना नसलेल्या आणि अस्वच्छ वातावरणात चालवल्या जाणाऱ्या अन्न व्यवसायांवर कठोर कारवाईची गरज अधोरेखित झाली आहे.

मालकाचा शोध सुरू

या डबे पुरवठा आस्थापनाच्या कामगारांनी मालकाची कोणतीही माहिती उघड केली नाही, ज्यामुळे हा व्यवसाय नेमका कोणी चालवला होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एफडीएचे अधिकारी आता या अवैध व्यवसायाच्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेत आहेत.      

हेही वाचा