बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील मोहिशेत गावाजवळील घटना
जोयडा : बेळगाव - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील मोहिशेत गावाजवळ मंगळवारी संध्याकाळी ट्रक पलटी झाला. अपघात झालेल्या ट्रकमधून गोव्यात म्हशींची तस्करी होत असल्याचे उघड झाले असून त्यात आठ म्हशी सापडल्या. या प्रकरणी खानापूर पोलिसांनी एकाला अटक केली असून बेकायदेशीर जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
चिकोडी तालुक्यातील वड्राळ येथील विठ्ठल रामाप्पा चंद्रकोडी असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. महामार्गावरील लोंढा ते गुंजी दरम्यान मोहिशेत गावच्या जवळ मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली. ट्रकचा अपघात होताच ट्रक चालक फरार होण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, तिथे जमलेल्या नागरिकांनी त्याला अडवले व त्याची पोलिसांना माहिती दिली. स्थानिकांनी आणखी एक ट्रक अपघात स्थळावरून पुढे रामनगरच्या दिशेने गेल्याचे पाहिले असून त्याची माहिती पोलिसांना दिली आहे.
तस्करीची पाळेमुळे खोलवर
गेल्या आठवड्यात रामनगर- अनमोड मार्गावरील बरडकोड येथे ट्रकमधून गोव्यात तस्करी होत होती. ट्रकमधून उडी मारल्याने एका म्हशीचा मृत्यू झाला होता. त्या म्हशीच्या पाठीवर पांढऱ्या रंगाने लिहिलेल्या खुणा होत्या. तशाच खुणा मोहिशेत गावाजवळ महामार्गावर अपघात झालेल्या ट्रकमधील म्हशींवर आढळून आल्या आहेत. यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. गोव्यात कत्तलीसाठी या म्हशी नेल्या जात असल्याचा संशय असून त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.