बालिकेचे अपहरण करणाऱ्यास १० वर्षांचा तुरुंगवास

३५ हजारांचा दंड : मडगावातून २०१७ मध्ये झाले होते अपहरण


09th July, 11:52 pm
बालिकेचे अपहरण करणाऱ्यास १० वर्षांचा तुरुंगवास

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मडगाव कोकण रेल्वे प्लॅटफॉर्मवरून २०१७ मध्ये तीन वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणी बाल न्यायालयाने रिझवान कालू इंदू या आरोपीला दहा वर्षे कारावास आणि ३५ हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली. याबाबतचा निवाडा बाल न्यायालयाचे अध्यक्ष सई प्रभुदेसाई यांनी दिला.
या प्रकरणी मडगाव कोकण रेल्वे पोलिसांनी १ नोव्हेंबर २०१७ रोजी गुन्हा नोंदवला होता. त्यानुसार, हुबळीतील कुटुंब ३१ ऑक्टोबर २०१७ रोजी एक क्रमांक प्लॅटफॉर्मवर मुलांसह झोपले होते. १ नोव्हेंबर २०१७ रोजी पहाटे त्यांची तीन वर्षाची मुलगी बेपत्ता झाल्याचे समोर आले. रेल्वे स्थानक परिसरात शोध घेतला; परंतु ती मिळाली नाही. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, मध्यरात्री १.३० वा. एक व्यक्ती मुलीला घेऊन जात आहे. तो मुंबईला जाणाऱ्या रेल्वेत चढल्याचे दिसून आले. वरील प्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र मडकईकर यांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. संशयित मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावरून बाहेर पडताना दिसला. याची दखल घेऊन एक पथक मुंबईला पाठवण्यात आले. शेजारी राज्यांतील पोलिसांना संशयिताचा फोटो आणि व्हिडिओ पाठविण्यात आला होता. पोलिसांनी अनेकदा शेजारी राज्यांत पथक पाठवून चौकशी केली होती.
कर्नाटकातील मंगळुरू पोलिसांनी ९ सप्टेंबर २०१८ रोजी आरोपी रिझवान कालू इंदू याला अटक केली. त्याच्या आणि अपहरणकर्त्याच्या चेहऱ्यात साम्य असल्याने तेथील पोलिसांनी कोकण पोलिसांना संपर्क करून संशयित सापडल्याची माहिती दिली. कोकण रेल्वे पोलिसांनी आरोपी रिझवानला गोव्यात आणून चौकशी केली. त्यानेच मुलीचे अपहरण केल्याचे स्पष्ट झाले. सदर मुलगी भोपाळमध्ये असल्याचे त्याने सांगितले. पोलीस निरीक्षक मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मुलीच्या कुटंबियांना शोधून काढले. मुलीला त्यांच्या स्वाधीन केले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी बाल न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
बाल न्यायालयात मुलीची व तिच्या पालकांची साक्ष महत्त्वाची ठरली. याशिवाय मडगावतील दोन मूकबधिरांनी दिलेल्या साक्षीही महत्त्वाच्या होत्या. सरकारी वकील फ्रान्सिका नोरोन्हा, अॅना मेडोंसा आणि थेमा नार्वेकर यांनी युक्तिवाद करून आरोपीच्या विरोधातील पुरावे सिद्ध केले. बाल न्यायालयाने साक्ष व पुराव्यांची दखल घेऊन आरोपी रिझवानला दोषी ठरवून शिक्षा ठोठावली.
मूकबधिरांनी काढलेल्या व्हिडिओमुळे सापडले धागेदोरे
तीन वर्षीय मुलीचे अपहरण केल्यानंतर आरोपी रिझवानने रेल्वेतून मुंबईला पळ काढला होता. याच दरम्यान आरोपीचे मडगावातील दोघा मूकबधिरांशी भांडण झाले होते. त्यांनी आरोपीचा व्हिडिओ काढला होता. त्यांनी तो व्हिडिओ पोलिसांना दिला. त्या व्हिडिओमुळे आणि दोघांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. दोघांनी न्यायालयात दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली.
न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा
भा.दं.सं.च्या कलम ३६३ अंतर्गत ७ वर्षांचा कारावास आणि १० हजार रुपयांचा दंड. दंड न भरल्यास एक वर्षाची साधी कैद.
भा.दं.सं.च्या कलम ३६३ - ए अंतर्गत १० वर्षांचा कारावास आणि २० हजार रुपये दंड. दंड न भरल्यास एक वर्षाची साधी कैद.
गोवा बाल कायद्याचे कलम ८(२) अंतर्गत ३ वर्षांचा कारावास आणि ५ हजार रुपयांचा दंड. दंड न भरल्यास सहा महिन्यांची साधी कैद.
सर्व शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत.