पर्रा येथे मामाकडून भाच्याचा निर्घृण खून

मामासह मामेभावालाही अटक : खुनासाठी वापरलेली हत्यारे जप्त


9 hours ago
पर्रा येथे मामाकडून भाच्याचा निर्घृण खून

संशयितांना अटक करून नेताना म्हापसा पोलीस. (उमेश झर्मेकर)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : फोंडाकवाडो, पर्रा येथे व्हिलाच्या बांधकामस्थळी राहत्या झोपडीत द्रौपदा तुलाराम नाईक (३०, रा. मूळ ओडिशा) या कामगाराचा निर्घृण खून करण्यात आला. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी सत्या काकणधर नाबरंगरूपा (५०) व थबीर सत्या नाबरंगरूपा (३१) या बाप-लेकाला अटक केली. संशयित आरोपीही ओडिशातीलच असून संशयित आरोपी सत्या हा द्रौपदाचा मामा होता.
सोमवार, ७ रोजी रात्री ९ च्या सुमारास हा खुनाचा प्रकार घडला. याप्रकरणी व्हिला कंत्राटदाराचा पर्यवेक्षक विजय नाईक (रा. बस्तोडा व मूळ कर्नाटक) यांनी पोलिसांत तक्रार दिली. द्रौपदा व संशयित आरोपी हे गवंडी कामगार असून व्हिलाचे बांधकाम करत होते. विजय यांनी त्यांना बोडकेवड, कळंगुट येथून आणले होते. संशयितांनी लोखंडी रॉड आणि सुरीच्या साहाय्याने हल्ला करून द्रौपदाचा खून केला.
संशयितांनी द्रौपदाच्या डोके, शरीरावर तसेच गुप्तांगावरही वार केले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन द्रौपदाचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर संशयितांनी पळ काढला. खुनाचा प्रकार पाहून पोलीसही हादरले.
विजय नाईक यांनी तिघाही कामगारांना चारच दिवसांपूर्वी गवंडी कामासाठी आणले होते. तेव्हापासून द्रौपदा आणि संशयित असे तिघेच बांधकामस्थळी पत्र्यांच्या झोपडीत राहत होते. दुपारपासून संशयित आणि द्रौपदामध्ये बाचाबाची सुरू होती. रात्री बांधकाम प्रकल्प सुपरवायझरने एका कामगाराला घटनास्थळी त्या कामगारांना पाहण्यासाठी पाठवले होते. तेव्हा हा खुनाचा प्रकार उघडकीस आला. झोपडीत द्रौपदा रक्तबंबाळ स्थितीत निपचित पडल्याचे आढळून आले. त्याला रुग्णवाहिकेतून म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निखील पालेकर व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह गोमेकॉत शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता व उपअधीक्षक विल्सन डिसोझा यांनी घटनास्थळाची पाहणी केली. मंगळवारी सकाळी श्वान व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले.
फरार संशयितांना पकडण्यासाठी पोलिसांनी रात्रीच शोध मोहीम हाती घेतली. काही तासांनी पहाटेच्या सुमारास पर्रा येथूनच त्यांना ताब्यात घेतले. नंतर खूनाच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. निरीक्षक पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजय धुरी, यशवंत मांद्रेकर, बाबलो परब, विराज काेरगावकर, साहाय्यक उपनिरीक्षक महेश शेटगावकर, हवालदार सुशांत चोपडेकर व इतरांनी ही कामगिरी बजावली.
संशयितांचे पोलीस चौकशीला असहकार्य
संशयित पोलीस चौकशीला सहकार्य करत नाहीत. त्यांनी द्रौपदा नाईकचे योग्य नावही उघड करण्यास असमर्थता दर्शविली. पोलिसांनी परिसरात वास्तव्यास असलेल्या ओडिशातील कामगारांशी संपर्क साधून द्रौपदाचे योग्य नाव शोधून काढले आणि त्याची ओळख पटवली. द्रौपदाचे रक्त संशयितांच्या कपड्यांना लागले होते. तरीही संशयित गुन्ह्याची कबुली देत नव्हते.
घटनेवेळी तिघेही दारूच्या नशेत
संशयित बाप-लेकाने संगनमताने द्रौपदाची हत्या केली. या खुनासाठी संशयितांनी वापरलेली लोखंडी रॉड, कमरपट्टा व सुरी जप्त करण्यात आली आहे. खुनामागील कारणाचा शोध सुरू आहे. म्हापसा पोलीस सर्व बाजूने तपास करत आहेत. घटनेवेळी तिघेही दारूच्या नशेत होते, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक विल्सन डिसोझा यांनी पत्रकारांना दिली.

हेही वाचा