५८ कोटी खड्ड्यात : पावसाळ्यानंतर दुरुस्ती करण्याचे आश्वासन
चोर्ला मार्गावरील रस्त्यावर पडलेले खड्डे. (लुईस रॉड्रिग्ज)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
बेळगाव : दोन महिन्यांपूर्वीच गोव्याहून बेळगावला जोडणाऱ्या सर्वांत जवळचा चोर्ला मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले होते. यासाठी तब्बल ५८ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र मुसळधार पावसाने रस्त्यावरील डांबर वाहून गेले असून ४३.३८१ किमी अंतराच्या कर्नाटक विभागातील रस्त्यावर पुन्हा खड्ड्यांनी डोके वर काढले आहे. यामुळे या मार्गावरून नियमित प्रवास करणारे चालक आणि प्रवाशांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
फेब्रुवारी महिन्यात कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जरकीहोळी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ५८ कोटी रुपये मंजूर करून घेतले होते. या निधीतून पिरनवाडी (बेळगाव) ते चोर्ला दरम्यानच्या ४३.३८१ किमी रस्त्याची दुरुस्ती व पुनर्बांधणी करण्यात आली होती. पावसाळ्यापूर्वीच अंतिम थर टाकून रस्ता पूर्ण करण्यात आला होता. अधिकाऱ्यांनी त्यावेळी गुणवत्ता तपासणी केल्याचा दावा केला होता. मात्र पावसाळा सुरू होताच रस्त्याची वरची थर सैल होऊ लागली व केवळ काही दिवसांतच खड्डे निर्माण झाले. विशेषतः कणकुंबी ते चोर्ला दरम्यानचा भाग खूपच खराब झाला आहे.
फक्त दोनच महिन्यांपूर्वी हा रस्ता डांबरीकरण केला होता. तेव्हा प्रवास सुखद झाला होता. आता तोच रस्ता खड्ड्यांनी भरला आहे. हा प्रकार धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया एका नियमित प्रवाशाने व्यक्त केली. रस्त्याच्या बाजूला पाणी जाण्यासाठी गटार नाही. तसेच रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होते. यामुळे रस्ता खराब झाला असावा, अशी शक्यता काही जणांनी व्यक्त केली.
रस्त्याच्या गुणवत्तेबाबत तडजोड नाही : पीडब्ल्यूडी